Monday, May 5, 2025

देशमहत्वाची बातमी

North India : उत्तर भारतात थंडीची लाट पसरणार

शिमला (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात (North India) थंडीची लाट पसरणार आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व काश्मीर खोऱ्यातील ताज्या बर्फवृष्टीनंतर संपूर्ण उत्तर भारतात 'कोल्ड अटॅक' होणार आहे. दुसरीकडे लाहौल स्पीतिच्या केलोंगचे किमान तापमान उणे ६.९ अंशांपर्यंत घसरले आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यापासून चंदीगड, पंजाब, हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेशात धुक्याचे साम्राज्य पसरेल. पर्वतरांगांतील बर्फाळ हवेमुळे मैदानी भागात थंडी वाढण्यास सुरुवात होईल.

शेजारच्या पंजाबमधील अमृतसरमध्येही कमाल तापमानात ८ अंश सेल्सिअसची घट नोंदवण्यात आली. येथे किमान तापमान ११.९ डिग्री व कमाल तापमान १९.८ डिग्री नोंदवण्यात आले. चंदीगडच्या कमाल तापमानात ४ डिग्रीची घट झाल्यानंतर २३.९ व किमान तापमान १४.२ डिग्री नोंदवण्यात आले. अंबाला, लुधियाना, पटियाला, हिसार व जयपूरच्या तापमानातही १ ते ४ डिग्रीची घट नोंदवण्यात आली.

हवामान केंद्र शिमलाचे संचालक सुरेंद्र पाल यांनी सांगितले की, डोंगरावरील ताज्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात धुके पसरल्यामुळे दृश्यमानता कमी होईल. उत्तर भारतातील बहुतांश शहरातील किमान तापमान १० डिग्रीच्या खाली घसरू शकते. धुकेही पसरू शकते.

हिमाचलच्या मनाली, नारकंडा, शिकारी देवी व बिजली महादेवमध्ये मागील २४ तासांत या हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. तर मैदानी भागांत हिवाळ्यातील पहिला पाऊस झाला आहे. गत ४८ तासांत लाहौल स्पीतिच्या कुकुमसेरीत सर्वाधिक २४ सेमी, कोकसरमध्ये २२ सेमी, केलोंगमध्ये १५ सेमी, गोंदलात १३ सेमी व खदरालामध्ये ३ सेमी बर्फवृष्टी झाली आहे. दुसरीकडे, उत्तराखंड व काश्मीर खोऱ्यातही बर्फवृष्टी सुरू आहे. गुलमर्गसह खोऱ्यातील अनेक भागांतील तापमान सध्या मायनसमध्ये गेले आहे.

Comments
Add Comment