
नागपूर (हिं.स.) : कृषी क्षेत्रात संशोधन करणार्या शासनाच्या संस्थांनी व संशोधकांनी शेतक-यांचे उत्पादन वाढविण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान शेतक-यांना उपलब्ध करून द्यावे. तसेच हे तंत्रज्ञान समाजातील शेवटच्या माणसापर्यंतही पोहचावे, याची जबाबदारी घ्यावी. यामुळे शेतक-याचे उत्पादनाचा दर्जा वाढेल, उत्पादन कमी खर्चात होईल, उत्पन्न वाढेल व निर्यातही वाढेल, असा विश्वास केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
भाकृअपच्या केंद्रीय निंबुवर्गीय अनुसंधान संस्थेतर्फे ‘रोगमुक्त निंबुवर्गीय रोपट्यांची निर्मिती’ या विषयावर नागपुरात आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला अनुसंस्थान संस्थेचे डॉ. घोष, डॉ. महापात्रा, सी.डी. मायी व अन्य उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले की, विदर्भात उसाची संस्कृती नाही. पण मी हिंमत केली आणि कारखाना सुरु केला. आज कुठे तो नुकसानीतून बाहेर पडला आहे. संशोधन हे आज गरजेचे आहे. उत्पादनाच्या दर्जाशी कोणताही समझोता न करता निंबुवर्गीय रोपे तयार करणा-या नर्सरींनी रोपे तयार करावी हे लक्षात ठेवावे. निंबू, संत्रा, मोसंबी या फळझाडांची अशी कलम तयार झाली पाहिजे की त्यापासून होणारे उत्पादन हे आंतरराष्ट्रीय दर्जाची बरोबरी करणारे असावे. चांगले उत्पादन मिळाले तर शेतक-यांचा फायदा होईल. अशा सर्व नर्सरींवर केंद्रीय निंबुवर्गीय अनुसंधान केंद्राने नियंत्रण ठेवावे, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले.
आमच्याकडील संत्रा चांगला आहे. पण ग्राहकांची पसंती ज्या संत्र्याला असेल तोच संत्रा बाजारात आणला जाईल, असे सांगून ते म्हणाले. नर्सरींची तपासणी करा, त्यांची नोंदणी करा, नर्सरीतून मिळणा-या रोपांची तपासणी करा, दर्जा तपासा. निर्यातीसाठी लागणा-या दर्जाची रोपे तयार व्हावी यासाठी प्रयत्न करा, ही सर्व जबाबदारी आपलीच आहे. अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये संत्र्याची शेती अधिक आहे. नर्सरींनी चांगली व रोगमुक्त रोपे तयार केली तर शेतक-यांना चांगले कलम उपलब्ध होईल. तसेच वातावरणातील बदलाचा निंबुवर्गीय फळझाडांवर कोणताच विपरित परिणाम होणार नाही यावरही संशोधन व्हावे. हे करताना आर्थिक अंकेक्षणासोबत कामगिरीचेही अंकेक्षण व्हावे असे गडकरींनी सांगितले.