
नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत
वसंत भोईर
वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला जुनी पाणीयोजना अपुरी पडत असल्याने २०१४ मध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. जानेवारी २०१४ मध्ये योजनेचे कामही सुरू झाले. मात्र या ना त्या कारणाने योजनेचे काम रखडले. तब्बल नऊ वर्षानंतरही या योजनेचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे आणखी किती काळ नागरिकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागणार, हे मात्र अनिश्चित आहे. महावितरण कंपनीकडे सदर पाणीयोजनेच्या विद्युत मीटरसाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यासाठी पैसेही भरण्यात आले आहेत. विद्युत मीटर मिळताच पाणीयोजना सुरू करण्यात येईल, असे ठेकेदार संदेश बुटाला यांनी सांगितले.
कुडूस परिसरात डी प्लस झोनमुळे अनेक कारखाने आले आहेत. कारखानदारांमुळे येथील लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. पूर्वी फक्त कुडूस हे छोटेसे गाव होते. जेमतेम सात ते आठ हजार लोकवस्ती होती. मात्र गेल्या काही वर्षात कुडूस गावासह पाच ते सहा उपनगरे वाढली. सतत वस्ती वाढत आहे. आजमितीला ३० ते ३५ हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे. कूडूस, चिंचघर येथे मोठ्या शैक्षणिक संस्था असल्याने परिसरातील नागरिक चांगल्या शिक्षणासाठी मुलांचे कुडूस येथील शाळेत प्रवेश घेत असल्याने ते तेथेच वस्ती करतात. या कारणामुळे वाढत्या वस्तीला जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत होती.
उपनगरांना पाणीपुरवठा न झाल्याने येथील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. वाढत्या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन सरपंच कुमार जाबर व उपसरपंच मिलिंद चौधरी यांनी प्रयत्न करून ५ कोटी रुपये किंमतीची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. तिचे भूमिपूजन गाजावाजा करत तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
१८ जानेवारी २०१४ साली या योजनेचे काम सुरू केले. योजनेच्या कामासाठी दोन वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. मात्र पहिल्यांदा पाण्याची टाकी व जलशुद्धीकरणासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने काम रखडले होते. त्यानंतर पाईपलाईन निकृष्ट दर्जाची केली असल्याचा आरोप करीत योजनेचे काम थांबले होते.
लोकप्रतिनिधींना अपयश
कुडूस ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच मिलिंद चौधरी यांच्या कालावधीत ही पाणी योजना मंजूर झाली. तिचे काम सन २०१४ मध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर २०१६ ला त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपल्यानंतर २०१६ ला निवडणूक झाली. या निवडणुकीत चौधरी यांच्या गटाचा पराभव होऊन दुसऱ्या गटाची सत्ता आली. त्यानंतर २०२१ साली दुस-या गटाचाही कार्यकाळ संपला तरीही ही योजना पूर्ण करता आली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधीचे अपयश दिसून आले.
कुडूस पाणीयोजनेचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत ही योजना सुरू करण्यात येईल. -अनिरुद्ध पाटील, ग्रामविकास अधिकारी, कुडूस