Monday, May 5, 2025

महामुंबईपालघर

युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती करा

युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती करा

पालघर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पाऊस ओसरला असून यंदा झालेल्या अतिवृष्टीमध्ये शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची पार दुर्दशा झाली झाली आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांची डागडुजी व दुरुस्तीची कामे वेगाने करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

यंदा झालेल्या अतिवृष्टीमध्ये पालघर, बोईसर, वसई, विरार, नालासोपारा, सफाळे, डहाणू व जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव काळात गणेशमूर्ती आणणे व विसर्जनास घेऊन जाणे या खड्ड्यांमुळे अत्यंत जिकीरीचे झाले होते. त्यावेळी तात्पुरती डागडुजी करणे, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात रॅबिट टाकणे अशा महत्त्वाच्या कामांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागला.

दुसरीकडे, रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन तरुणांचे बळी गेले आहेत. वसई तालुक्यातील कामण-भिवंडी, शिरसाड-अंबाडी या रस्त्यावर अगणित अपघात झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आता पाऊस ओसरल्यामुळे संबधित विभागाने दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेतली पाहिजेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

शहरातील रस्त्यांची पार दुर्दशा झाली असून आम्ही जीव मुठीत धरून व्यवसाय करत आहोत. रस्त्यावर पडलेले खड्डे पाहून रिक्षा चालवण्याचे धाडस होत नाही. - अनंत पाटील, रिक्षाचालक, विरार पूर्व

जिल्ह्यात सर्वत्र रस्ते उखडले आहेत. अतिवृष्टीमध्ये रस्त्याची साईडपट्टी उखडली गेली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत अनेक अपघात घडले. सफाळे ते वरई फाटा हा मुख्य रस्ता त्वरित दुरुस्त होणे गरजेचे आहे. - सुंदरराज शेळके सफाळे, पालघर

शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यांना दिसत नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळे करदात्यांना सध्या हालअपेष्टाना तोंड द्यावे लागत आहे. - शाम देसाई, दुचाकीस्वार, नालासोपारा

आम्हाला खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून ये-जा करताना खूप त्रास होतो. वाहने अक्षरशः हेलकावे खातात. खड्ड्यात ती उलटून पादचाऱ्यांच्या अंगावर पडतात की काय, अशी सतत भीती वाटते. त्यामुळे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेणे आवश्यक आहे. - सुनीला नायक, चार्टर्ड अकाउंटंट, माणिकपूर

Comments
Add Comment