
मुरबाड (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिद्धगडच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय पंचायत राजचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सिद्धगडसाठी पुढाकार घेतला असून, शासकीय यंत्रणेला वेगाने कामे हाती घेण्याचा आदेश दिला आहे. येत्या २ जानेवारीच्या हुतात्मा दिनी रस्त्यासह काही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय मंत्री पाटील यांनी सिद्धगड स्मारकाचा विकास व तेथील सुविधांबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे आमदार किसन कथोरे, सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार गोटीराम पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, जि.प. सदस्य उल्हास बांगर, माजी उपसभापती दीपक खाटेघरे आदींसह वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.