Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआदर्श विद्यार्थी बना

आदर्श विद्यार्थी बना

रवींद्र तांबे

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शाळेत जाणारा प्रत्येक विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी असतो; परंतु प्रत्येक वर्षी शाळांमध्ये एका विद्यार्थ्याची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करून वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये त्याचा गौरव करण्यात येतो. त्याचे एकमेव कारण असते ते म्हणजे मागील वर्षभर त्यांनी शिस्तीचे प्रामाणिकपणे पालन केलेले असावे. केवळ वर्गामध्ये पहिला आला म्हणजे तो आदर्श विद्यार्थी आहे अशातला भाग नाही. तसेच त्याने शालेय स्तरावर खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळविले त्याला आदर्श विद्यार्थी देता येत नाही. त्यासाठी तो विद्यार्थी सर्व गुण संपन्न असला पाहिजे.

मी माध्यमिक विभागात असताना विद्यार्थ्याची अभ्यासातील प्रगती, खेळामध्ये विशेष प्राविण्य व त्याच्या अंगी असणारी शिस्त याचा वर्ग शिक्षक विचार करून त्या वर्गातील एका विद्यार्थ्याची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करण्यात येत असे. तेव्हा आपल्या वर्गातील आदर्श विद्यार्थी म्हणून कोणाची निवड होणार याची उत्सुकता सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना असायची. त्याचे नाव मात्र गुलदस्त्यातच असायचे त्यामुळे त्याची उत्सुकता शिगेला अधिक पोहोचलेली असायची. ज्याला आदर्श विद्यार्थी म्हणून मान मिळायचा त्याची पुढील वर्षामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर वर्ग प्रतिनिधी म्हणून निवड केली जात असे. आता ही आदर्श विद्यार्थ्यांची मूळ संकल्पना नष्ट होत चालली आहे. ती अबाधित राहिली पाहिजे त्यासाठी प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करण्यात यावी. नो फिक्सिंग…!

आता तर आदर्श विद्यार्थी निवडीचे राजकारण होत असताना दिसून येतात. त्यामुळे गरीब व शाळेच्या उज्ज्वल यशाला हातभार लावणारे विद्यार्थी बाजूला होऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राजकीय नेत्यांकडून पत्र आलेली असतात, ती मी फक्त आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेच्या काळात वर्तमानपत्रात वाचली होती. आता तर राजकीय पुढाऱ्यांचे प्रतिनिधी शाळेच्या आवारात फिरताना दिसतात. तसेच ते चौकशीही करीत असतात. त्यामुळे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे शाळेचे नाव उज्ज्वल करतात ते मागे पडतात. त्याला गटबाजी कारणीभूत ठरते.

बऱ्याच ठिकाणी आपल्या गटाचा विद्यार्थी आदर्श म्हणून निवड व्हावी, त्या दृष्टीने प्रयत्न केला जातो. तसे काही शिक्षक वर्गसुद्धा नेत्यांच्या मागून फिरताना दिसतात. याचा परिणाम राजकीयदृष्ट्या दबाव आणला जातो. आदर्श विद्यार्थी निवडीच्या वेळी गटातटात शाळेच्या गेटच्या समोर राडे झालेले पहायला मिळतात. तेव्हा शैक्षणिक क्षेत्रात असे वातावरण पोषक नाही. तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड जरी झाली तरी वातावरण धुमसत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात खरी मजा येत नाही. यात आदर्श विद्यार्थी सुद्धा दडपणाखाली येतो, तेव्हा भविष्य काळाचा विचार करून हे चित्र बदलणे विद्यार्थ्यांच्या तसेच शैक्षणिक संस्थेच्या दृष्टीने गरजेचे आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे आदर्श विद्यार्थ्याची निवड करताना काही निकष ठेवणे गरजेचे आहे. तसेच त्याला विशिष्ट गुणसुद्धा द्यायला हवे. यासाठी शालेय तसेच महाविद्यालयात निवड समिती गठीत करावी. यासमितीमध्ये प्रामुख्याने शाळेचे मुख्याध्यापक, एक शिक्षक प्रतिनिधी, एक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश असावा. यासमितीने प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करण्यात यावी. ती सुद्धा नि:पक्षपातीपणे निवड करावी. म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला आपल्यावर अन्याय केला, असे वाटता कामा नये. निवड समितीने शैक्षणिक वर्षातील केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करून विद्यार्थ्याची निवड करावी. त्यासाठी काही निकष ठरविणे आवश्यक आहे. त्या निकषाच्या आधारे त्याची निवड करण्यात यावी. तसे वर्गातील सर्वच विद्यार्थी आदर्श असतात. त्यामुळे पुढील वर्षी प्रत्येक विद्यार्थी निकषाचे पालन करेल. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्याचा आदर्श इतर विद्यार्थी घेतील. याचा परिणाम विद्यार्थ्यांना शिस्त लागून निकालाची टक्केवारी सुध्दा वाढू शकते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांविषयी आपुलकीची भावना निर्माण होण्याला मदत होते. तेव्हा विद्यार्थ्यांनी महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे आपल्या आदर्शाची. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांनी राजकारणापासून चार हात दूर राहिले पाहिजे. जरी आपल्याला आदर्श विद्यार्थी म्हणून निवड झाली नसली तरी आपल्या वर्गामध्ये एक आदर्श निर्माण करावा की, जेणेकरून वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले नाव काढले पाहिजे.

शाळा व महाविद्यालयांमध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक वर्गाचे दोन गट तयार करून विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यानंतर विविध प्रकारामध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये त्यांचा गौरव करण्यात येतो. तसेच काही विद्यार्थ्यांच्या कार्याचा सुद्धा सन्मान करण्यात येतो. तेव्हा शाळेमध्ये गौरव हो अथवा न हो आपले शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनातील अभ्यास व इतर कामे प्रामाणिकपणे केली पाहिजेत. कारण शाळेत जाणारा प्रत्येक विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी असतो हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवावे. त्यासाठी विद्यार्थी दशेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आदर्श विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करावा. कारण यातच विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -