Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलPoems and Riddles : बाळूची हुशारी कविता आणि काव्यकोडी

Poems and Riddles : बाळूची हुशारी कविता आणि काव्यकोडी

  • कविता : एकनाथ आव्हाड

बाळूची हुशारी…

आमच्या बाळूची
काय सांगू कमाल
चुटकीत कामाचा तो
लावतो निकाल
एकदा काय झाले
आईने केले लाडू
म्हणाली गावाला
यातले थोडे धाडू
गरमागरम लाडू
साजूक तुपातले
आई म्हणाली उद्या
खाऊया सगळे
लाडूकडे पाहून
बाळूने म्हटले
माझ्या तर तोंडाला
पाणीच सुटले
कशाला उद्याची
वाट मी पाहू
लाडवांचा समाचार
आजच घेऊ
बाळूने पाच लाडू
गुपचूप केले फस्त
उद्याचे काम म्हणे
आज केले मस्त !

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

१) उसाचा रस, आटवला खूप
ढेपेसारखे, घेई तो रूप
खनिज, क्षार, ठेवतो पोटात
साऱ्यांशी गोड, बोलतो थाटात.
पुरणाच्या पोळीला, याचीच सोबत
तिळाच्या साथीला, येतो हा पळत
मुंगळे याच्याकडे, घेतात धाव
खूप, झालं सांगून ओळखा याचं नाव?

२) यासारखा गरीब प्राणी, दुसरा नाही कुणी?
उपयोगी पडणारा, हा आहे बहुगुणी
तरीसुद्धा जो तो, टाकून बोले याला
याच्यासारखं वागू नये, सांगे दुसऱ्याला
ओझी याच्या पाठीवर, मान सदा खाली
कुंभार असतो त्याचा, खराखुरा वाली
उकिरड्यावरसुद्धा, तो जाऊन चरतो
आल्यावर राग मात्र, लाथा कोण मारतो?

३) कापडासारखे, ते आहे ढवळे
कधी कधी काळे तर कधी सावळे
दिवसा सूर्याची, त्याला मिळे साथ
ढगांचा ताफाही फिरे येथे जोशात
चंद्राची दिमाखात, फिरते स्वारी
चांदण्या हसून, लुकलुक करी
रात्री चमचम, चमकत राहते
दिवसा कोण मात्र, लख्ख होते?

उत्तर –
१) गूळ
२) गाढव
३) आकाश

eknathavhad23 @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -