Friday, May 17, 2024

वृत्ती…

  • प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ

माणसाचा स्वभाव किंवा वृत्ती ही उपजतच असते की, त्याला आणखी काही कारणे असतात? याचा मी नेहमी विचार करत असते. एक छोटेसे उदाहरण मी देते. मी एक योगा क्लासची विद्यार्थिनी किंवा साधक आहे. इथे साधारण तिशीपासून नव्वदीपर्यंतची माणसे येतात. हा क्लास माझ्या सोसायटीच्या आत आमच्याच कम्युनिटी हॉलमध्ये भरतो. हा कम्युनिटी हॉल हा संपूर्णतः काचेचा आहे. या क्लासमधून आसपासची झाडे, उडणारे पक्षी, समोरच्या बीएआरसीला चहूबाजूंनी वेढलेल्या डोंगरमाथ्यामधून उगवणारा सूर्य खूप छान दिसतो. हा क्लास पहिल्या मजल्यावर असल्यामुळे खालचा निळ्याशार टाइल्स लावलेला स्वीमिंग पूल आणि त्यात संथपणे हलणारे पाणी दिसते. कधीकाळी पोहणारी माणसेही दिसतात. एका बाजूने रस्ता आणि रहदारीही दिसते. या क्लासला काचेचे सरकवायचे दार आहे.

तर आपण या लेखात परत माणसांच्या वृत्तीकडे वळूया. क्लास सकाळी साडेपाचला सुरू होतो. सर्वप्रथम आम्ही ‘प्रार्थना’ म्हणतो. आता प्रार्थना फार गाऊन म्हणत नाही; परंतु एका लयीत म्हणतो. ती लय तशी कठीण नाही. पण संपूर्ण क्लास जेव्हा ही प्रार्थना एका लयीत म्हणतो, तेव्हा एक साधक तो वाघ मागे लागल्यासारखा घाईघाईत म्हणतो त्यामुळे जिथे आम्ही पॉज घेतो किंवा वेगळा शब्द उच्चारत असतो, तेव्हा काहीतरी वेगळेच त्याच्या तोंडून ऐकू येते. आम्हा सर्वांपेक्षा तो तीन-चार शब्दांनी पुढे असतो. बरं ऐकू येऊ दे… त्याचा आवाज हा इतर संपूर्ण ग्रुपच्या आवाजापेक्षा जास्त मोठा आहे. त्यामुळे ते सर्वांनाच त्रासदायक होते, हे त्याला त्याचा वयाचा आम्ही मान राखतो त्यामुळे कोणी सांगू शकत नाही. पण आपण असे काहीतरी वेगळे करतोय, हे त्याला नक्कीच कळत असणार, याबद्दल मात्र शंका नाही. मग तो असे का वागतो?

कधी कधी सकाळची वेळ असल्यामुळे किंवा कोणत्याही कारणांनी एखाद्याला क्लासला पोहोचायला वेळ होतो. आता दोन महिलांचे मी निरीक्षण केले आहे. कारण बहुदा त्या दोघी नेहमीच उशिरा येतात. त्यातली एक महिला जेव्हा येते तेव्हा ती दार उघडताना आवाज करते आणि दार बंद करताना, तर त्याहूनही मोठा आवाज करते. प्रार्थना चालू असताना हमखास डोळे उघडले जातात. त्यानंतर ती चादर पसरवते, त्याचाही आवाज येतो. त्यात चादरीवर ती झटकून झटकून टॉवेल टाकते, त्याचाही विशिष्ट आवाज येतो आणि त्यानंतर ती पाण्याची बाटली उघडते, पाणी पिते, त्याचाही आवाज होतो. हे आठवड्यातून तीन ते चार वेळा घडते.

दुसरी एक महिला अशीच उशिरा येते. तेव्हा जर प्रार्थना चालू असेल, तर ती प्रार्थनेच्या मधे कधीच क्लासच्या आत येत नाही. ती दार उघडतही नाही. दाराच्या बाहेरच उभी राहते. क्लास काचेचा असल्यामुळे आम्हाला ती उभी असलेली दिसू शकते. पण आवाज होईल आणि प्रार्थनेत व्यत्यय येईल, याचा सूज्ञ विचार करत ती शांतपणे उभी असते. प्रार्थना झाली की, ती आत येते. ती आत येताना दाराचा कोणताही आवाज होत नाही. दार तेच असते, पण एकजण उघडताना फार मोठा आवाज, तर दुसरी उघडताना अजिबात आवाज नाही. त्यानंतर ती महिला अतिशय हळूवारपणे चादर टॉवेल टाकून आमचे जे आसन चालले असेल, त्याला ती सुरुवात करते.

आमच्या या योगा क्लासमध्ये आमचे शिक्षक काही सूचना देतात. आम्ही सर्व त्यांच्या सूचनेप्रमाणे उजवा हात वर, तर उजवा हात वर, डावा पाय खाली, तर डावा पाय खाली… जे काही ते सांगतात, तसे तसे करतो. मात्र आमच्यातला एक साधक उजवा पाय वर सांगितला की, डावा पाय वर करतो, असे काहीतरी वेगळेच करतो, तर आणखी एक साधक जर शिक्षक ‘पर्वतासन’ घेत असतील, तर ‘योगमुद्रा’ करतो, ‘हस्तोपादासन’ घेत असतील, तर ‘चक्रासन’ करतो, याचे कारण मला कळत नाही.
सकाळी साडेपाच ते सात अशा वेळी कोणती माणसे तुम्हाला फोन करणार आहेत किंवा काय असे महत्त्वाचे फोनवर मेसेज येणार आहेत? म्हणजे एखाद वेळेस एखाद्याला एखाद्या फोनची अतिमहत्त्वाच्या कामानिमित्त अपेक्षा असू शकते. नाही असे नाही, पण आमच्यातला एक साधक हा दर आसनानंतर फोन हातात घेऊन त्याला हाताळत बसतो. सकाळच्या वेळेस आमच्या योगाक्लासच्या आत तसा लाइट बंद असल्यामुळे अंधार असतो. कितीही नाही म्हटले तरी अचानक मोबाइलचा लाइट डोळ्यांवर आल्यामुळे त्याच्या या कृतीकडे सगळ्यांचे लक्ष जातेच! बाकी संपूर्ण क्लासमधील कोणीही मोबाइल सोबतसुद्धा घेऊन येत नाही.

कधीकधी एअर कंडिशन बंद असेल, तर आम्हाला हॉलच्या खिडक्या उघडाव्या लागतात. त्यामुळे क्लास सुटल्यावर साधारण पंधरा-वीस खिडक्या बंद करायच्या असतात. क्लास संपल्यावर सगळ्यांनी एकेक जरी खिडकी बंद केली तरी सुद्धा चालू शकते; परंतु दोन ते तीन साधक सोडले, तर सर्व तरातरा निघून जातात म्हणजे प्रत्येक वेळेस त्याच तीन-चार साधकांची जबाबदारी आहे का खिडक्या बंद करणे?

फक्त ‘योगक्लास’ हा विषय घेऊन मी आपल्याला काही उदाहरणे दिली. आपल्या घरातील माणसे, घरात कामाला येणाऱ्या मदतनीस, कामावर जाताना भेटलेली माणसे, कामाच्या ठिकाणी असणारे सहकारी यांच्या वृत्तींविषयी लिहायचे म्हटले, तर एक कादंबरीसुद्धा कमी पडेल, खंडच्या खंड लिहावे लागतील!

तर मला एवढेच सांगायचे आहे की, काही गोष्टी प्रत्येकाने जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजेत की, आपण समाजात वावरताना कसे वागायला पाहिजे. आपल्या कोणत्या कृतीमुळे इतर माणसांना त्रास होतो, ते दुखावले जातात, याचा विचार करण्याची गरज आहे. सुधारण्याला वाव असतोच, फक्त आपली तशी वृत्ती हवी!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -