Sunday, May 19, 2024
Homeदेशथंड पाण्यात शिजणारा आसामचा 'बोका राईस'

थंड पाण्यात शिजणारा आसामचा ‘बोका राईस’

बक्सा : भात मुख्यत: गरम पाण्यात शिजवला जातो. पण तुम्ही कधी थंड पाण्यात शिजणाऱ्या तांदळाबाबत ऐकलंय का? ते ‘बोका राईस’ नावाचे भात आपल्या भारतातच पिकते.

भारतात भातापासून अनेक पदार्थ बनवले जातात. बरेच लोक तांदूळ पाण्यात उकडून खातात. भात शिजवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, असा एक तांदळाचा प्रकार आपल्या देशात पिकवला जातो, ज्यासाठी तुम्हाला गरम पाणी किंवा पाणी उकळण्याची गरजच भासत नाही, तर फक्त थंड पाण्यातच हा तांदूळ शिजतो. एक विशेष प्रकारचा तांदूळ (बोका सॉल) जो सामान्य पाण्यात ठेवल्यानंतर ४५-६० मिनिटांत खायला तयार होतो आणि कोणत्याही आचेवर, गॅसवर किंवा चुलीवर शिजवावा लागत नाही. आणि ते सामान्य भातासारखे दिसते.

आसाममध्ये पिकणारा बोका राईस मॅजिक राईस म्हणूनही ओळखला जातो. नैसर्गिक सुबत्तेचे वरदान लाभलेल्या आसामची माती आणि तेथील हवामान यामुळे या तांदळाला एक वेगळीच चव आणि सुगंध असतो. बोका राईसची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप या भागांत प्रामुख्याने केली जाते.

आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजेच, जून महिन्यात बोका राईसची पेरणी केली जाते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होते. बोका तांदूळ किंवा बोका राईसची लागवड आसामच्या डोंगराळ भागांत राहणारे आदिवासी करतात. या तांदळात १०.७३ टक्के फायबर आणि ६.८ टक्के प्रोटीन असते. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटकही असतात. जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

इतिहासाची पाने उलटली तर बोका राईसचा एक सुवर्ण इतिहास नक्कीच वाचायला मिळेल. याच तांदळापासून शिजवण्यात आलेल्या भाताने अनेक शत्रूंचा खात्मा करण्यास मदत केली आहे. तसेच, याच तांदळाच्या मदतीने कित्येक युद्धे जिंकायला मदत केली आहे. ही कथा सतराव्या शतकातील आहे. जेव्हा अहोम सैनिक मुघल सैन्यापासून देशाचं रक्षण करण्यासाठी बोका राईस खात होते. हा तांदूळ सैनिकांचं राशन म्हणून युद्धात नेण्यात आला होता. या तांदळाला शिजवण्याची गरज नसल्यामुळे सैनिकांना युद्धभूमीवर त्याचं सेवन करणं सोयीचं ठरत होतं.

बोका राईस ५० ते ६० मिनिटं पाण्यात भिजवल्यानंतर भात तयार व्हायचा. हा तांदूळ बोका राईस, बोका चोले आणि ओरिझा सॅटिवा म्हणून ओळखला जातो. आसाममधील बोका तांदळापासून अनेक प्रकारचे पारंपारिक पदार्थ बनवले जातात, ज्यामध्ये बोका तांदूळ दही, गूळ, दूध, साखर किंवा इतर खाद्यपदार्थांसोबत दिला जातो.

बोका राईसचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे, जो थेट आसामशी संबंधित आहे. यामुळेच भारत सरकारने आसाममध्ये पिकवल्या जाणाऱ्या या तांदळाला जीआय टॅगही दिला आहे. आता या तांदळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही केली जाते.

बोका राईस शिजवायला जेवढा सोपा आहे, तेवढेच अवघड तो पिकवणे आहे. अर्धा एकर शेतातून केवळ पाच पोती तांदळाचे उत्पन्न येते. इतर तांदळाच्या जातींच्या तुलनेत हा तांदूळ १४५ दिवसांत पिकून काढणीला येतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -