Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीAshok Chavan : काँग्रेसचं नेतृत्व कमकुवत झालंय; अवघ्या १७ जागांवर त्यांची बोळवण...

Ashok Chavan : काँग्रेसचं नेतृत्व कमकुवत झालंय; अवघ्या १७ जागांवर त्यांची बोळवण केली!

भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचा खोचक टोला

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असतानाच राज्यातही आता महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) व महायुतीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. मविआने आज यासंबंधी पत्रकार परिषद घेत आपला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. या परिषदेत ठाकरे गट २१ (Thackeray Group), काँग्रेस १७ (Congress) तर शरद पवार गट १० (Sharad Pawar Group) जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले. त्यातील वादग्रस्त सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडेच तर भिवंडीची जागा ही शरद पवार गटाकडेच राहणार आहे, त्यामुळे परिषदेनंतरही काँग्रेसच्या गोटात कमालीची नाराजी पसरली असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीवर नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाष्य केलं आहे. ‘राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व कमकुवत झालंय’, अशी त्यांनी टीका केली आहे.

महाविकास आघाडीत सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेवरून तिढा निर्माण झाला होता. या दोन्ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मात्र मविआमध्ये ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना येथून उमेदवारी दिली, तर भिवंडी लोकसभेच्या जागेवर शरदचंद्र पवार गटाने सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व त्यांच्या या दोन पारंपरिक जागा आपल्याकडे घेऊ शकलं नाही, असं म्हणत राज्यातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका होत आहे. त्यात अशोक चव्हाण यांनीही टीका केली आहे.

भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले, ‘काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव आहे. राज्यात काँग्रेसला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची इतकी केविलवाणी परिस्थिती यापूर्वी कधीच झाली नव्हती. राज्यातलं काँग्रेसचं नेतृत्व खूप कमकुवत झालं आहे. काँग्रेसच्या हक्काच्या जागा त्यांना मिळाल्या नाहीत. काँग्रेसला त्यांच्या पारंपरिक सांगली आणि भिवंडीच्या जागा सोडाव्या लागतात, यातून पक्षाचं नेतृत्व किती कमकुवत झालंय हे सिद्ध होतं. महाविकास आघाडीत अवघ्या १७ जागांवर काँग्रेसची बोळवण होतेय, हे त्यांच्यासाठी वाईट चित्र आहे’.

केवळ सांगलीत काँग्रेस कमकुवत नाही तर पक्षाचं राज्यातलं नेतृत्व कमकुवत आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं. चव्हाण यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे होता असं बोललं जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -