Monday, May 13, 2024
Homeदेशअर्जुनवर आडनावाचे ओझे होण्याइतपत दबाव नको

अर्जुनवर आडनावाचे ओझे होण्याइतपत दबाव नको

कपिल देव यांनी सचिन पुत्राचे केले समर्थन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या देशात सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणतात. या क्रिकेटच्या देवाचा मुलगा म्हणेज अर्जुन तेंडुलकर हाही क्रिकेट खेळतो. मात्र, त्याची आणि सचिनची सतत बरोबरी केली जाते व ती अन्यायकारक आहे, असे क्रिकेटचे चाहते आणि तज्ज्ञ म्हणतात. याच प्रकरणावर आता माजी विश्वचषक विजेते आणि भारतीय कर्णधार कपिल देव यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

कपिल देव म्हणाले की, ‘अर्जुनला नेहमी त्याच्या आडनावामुळे अतिरिक्त दबावाला सामोरे जावे लागत आहे. तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून सर्वचजण त्याच्याबद्दल का बोलत आहेत? त्याला स्वतःच्या शैलीत आणि स्वत:च्या मनाप्रमाणे क्रिकेट खेळू द्या. सचिनशी त्याची तुलना करू नका. त्याला तेंडुलकर नावाचे तोटे आहेत, याची जाणीव होऊ देऊ नका. डॉन ब्रॅडमन यांच्या मुलाच्याबाबतीत हेच झाले. दबाव सहन न करू शकल्यामुळे त्याचे आडनावच काढून टाकले होते. अर्जुनवर तशी वेळ येऊ देवू नका’.

कपिल देव यांना वाटते की, अर्जुनवर अपेक्षांचे दडपण आणू नका. त्याने थोडाफार जरी त्याच्या वडिलांसारखा खेळ केला तरी त्याच्यासाठी ते खूप झाले. ‘तू फक्त तुझ्या खेळाचा आनंद घे. तुला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तू ५० टक्के जरी तुझ्या वडिलांसारखे खेळू शकला तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही,’ असा सल्ला कपिल देव यांनी अर्जुनला दिला आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामामध्ये अर्जुनला पदार्पणाची संधी मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. पण, त्याला एकाही सामन्यात खेळवण्यात आले नाही. या गोष्टीची सोशल मीडियासह क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा रंगली. मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांनी अर्जुनला या मोसमात एकही सामना न खेळवल्याबद्दल आपले विचार मांडले. त्यांच्या मते, २२ वर्षीय अर्जुनला आणखी बऱ्याच सरावाची गरज आहे.

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळायला न मिळाल्याने सचिन आणि अर्जुनचे अनेक चाहते निराश झाले आहेत. मुंबईने ३०लाख रुपये खर्च करून अर्जुनला लिलावामध्ये खरेदी केले होते. मुंबईने एकाही सामन्यात त्याला खेळवले नाही. त्याऐवजी इतर अनेक नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली. अनेकदा भारतीय क्रिकेट संघात नेट गोलंदाज म्हणून अर्जुनचा वापर केला जातो. त्याने विराट कोहली, रोहित शर्मा, अगदी एमएस धोनी आणि इतर दिग्गज फलंदाजांनाही गोलंदाजी केलेली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -