Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीCoaching classes : मनमानी कारभार करणार्‍या कोचिंग क्लासेसना बसणार चाप!

Coaching classes : मनमानी कारभार करणार्‍या कोचिंग क्लासेसना बसणार चाप!

केंद्र सरकारच्या नव्या सूचना जारी

नवी दिल्ली : शाळांच्या अवाढव्य फी (School fees) भरता भरता पालकांच्या नाकी नऊ येत असतानाच त्यात कोचिंग क्लासेसच्या (Coaching classes) फीची भर पडते. हे क्लासेस मनाला वाटेल तशा फी आकारतात. शिवाय क्लासशिवाय मुलांचा अभ्यास होत नाही, असा पालकांचा (Parents) एक गोड गैरसमज असतो. त्यामुळे ही फी भरण्यासाठी पालकांची पूर्णपणे तयारी असते. बर्‍याचदा आई व वडील दोघेही नोकरी करत असल्याने मुलांचा अभ्यास घेण्यासाठी कोणीही उपलब्ध नसल्यामुळेही क्लासचा पर्याय निवडला जातो. कोचिंग क्लासेसला दिलेल्या या अवाजवी महत्त्वामुळे त्यांचा मनमानी कारभार चालू असतो. याला आळा घालण्यासाठीच केंद्र सरकारने (Central government) नव्या सूचना जारी केल्या आहेत, ज्यामुळे अशा क्लासेसना चांगलाच चाप बसणार आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आणलेल्या नव्या नियमावलीनुसार १६ वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच चांगले मार्क्स आणि रँक मिळवून देण्याची दिशाभूल करणारी जाहिरातही करता येणार नाही. कोचिंग सेंटर्सचं नियमन आणि त्यांना कायदेशीर चौकटीत आणण्याची गरज होती. तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या अनियंत्रण वाढीवर रोख लावण्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, आगीच्या घटना, कोचिंगच्या घटनांमध्ये सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या अध्यापनाच्या पद्धतींबाबत सरकारकडं आलेल्या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

काय आहेत नव्या मार्गदर्शक सूचना?

  • कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाहीत.
  • कोचिंग सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत
  • पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाहीत.
  • संस्था १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही.
  • विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच व्हायला हवी.
  • दिशाभूल करणारी जाहीर कोणतीही कोचिंग संस्था करु शकत नाही.
  • कोचिंग सेंटर्स नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्तीची सेवा घेऊ शकत नाहीत.
  • कोचिंग सेंटर्सकडे ट्यूटरची पात्रता, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांचा अद्ययावत तपशील असलेली वेबसाइट असावी.

या मार्गदर्शक तत्त्वांच्या समुपदेशन प्रणाली असल्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही. या सर्व नियमांचा विद्यार्थ्यांना व पालकांना फायदाच होणार आहे. शिवाय क्लासमध्ये ठराविक मार्क्स आणायचेच अशा दडपणाखाली अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना स्वतःच्या कुवतीप्रमाणे अभ्यास करता येणार आहे. क्लास व शाळा अशा दोन ठिकाणच्या दोन वेगवेगळ्या पद्धतींमुळे व दोन्ही ठिकाणी दिल्या जाणार्‍या गृहपाठामुळे विद्यार्थ्यांना जखडून राहावे लागत होते. नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त त्यांचे छंद जोपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -