Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीअनिल जयसिंघानीचा उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल

अनिल जयसिंघानीचा उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीचे वडील अनिल जयसिंघानी याचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो व्हायरल झाल्याने आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

अमृता फडणवीस यांनी अनिक्षाबरोबर तिचे वडिल अनिल जयसिंघानी यांच्याविरोधाताही तक्रार दाखल केली आहे. अनिल जयसिंघानी हा ५ राज्यात वॉन्टेड आहे, इतकेच नाही तर ८ वर्षांपासून तो फरार आहे. आता अनिल जयसिंघानी याचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अनिल जयसिंघानी याचा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो समोर आला आहे.

शिवसेनेत केला होता प्रवेश

अनिल जयसिंघानी याने २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्ष प्रवेशाचे त्याचे फोटो आता सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याआधी २००२ मध्ये तो उल्हासनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक म्हणून निवडून आला होता. तर १९९५ आणि १९९७ मध्ये त्याने काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीला मुंबई सेशन कोर्टाने २१ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. अमृता फडणवीसांना लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी दिल्याप्रकरणी आरोपी अनिक्षा अनिल जयसिंघानीला डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली होती.

कोण आहे अनिल जयसिंघानी?

अनिल जयसिंघानी हा क्रिकेट बुकी आहे. ५ राज्यात १७ गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. गेल्या ८ वर्षांपासून तो फरार आहे. सट्टेबाजी प्रकरणात अनिल जयसिंघानीला तीन वेळा अटक करण्यात आली आहे. तर गोवा पोलिसांनी ११ मे २०१९ रोजी अनिल जयसिंघानी याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षांपूर्वी २०१५ मे मध्ये गुजरात ईडीने जयसिंघानी याच्या दोन घरांवर छापा मारला होता. जयसिंघानी विरोधात मनी लॉण्ड्रींग प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. पण तब्येतीचे कारण देत तो फरार झाला. त्यानंतर मुंबईतल्या दोन पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अनिल जयसिंघानी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्याही रडारवर आहे. अनिल जयसिंघानी उल्हासनगरमध्ये क्रिकेट बुकी म्हणून काम करत होता. अहमदाबाद सेशन कोर्टानेही त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. गुजरात इडीव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, आसाम, मध्य प्रदेश मध्येही त्याच्या शोध सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -