Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीMonsoon Update: नाल्यातून वाहून आलेल्या फ्रीज, कपाटामुळे अंधेरी भुयारी मार्ग तुंबला

Monsoon Update: नाल्यातून वाहून आलेल्या फ्रीज, कपाटामुळे अंधेरी भुयारी मार्ग तुंबला

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी केली पाहणी

मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी भुयारी मार्गाजवळून (Andheri Sub Way) वाहणाऱ्या मोगरा नाल्यातून वाहून आलेला फ्रीज तसेच कपाट, पलंग, ताडपत्री, रबरी पाईप आणि यासारख्या इतर साहित्यांनी शनिवारी संध्याकाळी अंधेरी भुयारी मार्गाची पावसाळी पाणी (Rain water) उदंचन करणारी यंत्रणा विस्कळीत करून टाकली, असे आता स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे तसेच के पूर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी अवघ्या तासभरात सर्व यंत्रणा पूर्ववत करून साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा केला. अंधेरी भुयारी मार्गाच्या स्थितीची महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी रविवारी पाहणी करून आढावा घेतला. पावसाचे पाणी साचू नये यासाठी अतिरिक्त नियोजन आणि उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अंधेरी भुयारी मार्ग हा मुंबईतील अतिसखल परिसरांपैकी एक आहे. अंधेरी भुयारी मार्गाला लागूनच मोगरा नाला वाहत जातो. मोगरा नाल्याच्या उगम स्थळापासून अंधेरी भुयारी मार्गापर्यंत सुमारे अडीच किलोमीटर लांबीपर्यंत हा नाला वाहत येतो. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्यात आली. त्यानंतर देखील नाल्यांमध्ये नागरिकांकडून टाकला जाणारा कचरा तरंगताना आढळत असल्याने तो देखील पालिकेच्या यंत्रणेने वारंवार काढून नाल्यांचा प्रवाह वाहता राहील याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. असे असताना, शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस होत असताना मोगरा नाल्यातील प्रवाहा सोबत अतिशय मोठ्या प्रमाणावर तरंगता कचरा अंधेरी भुयारी मार्गाच्या दिशेने आला. त्यामध्ये १६५ लीटर क्षमतेचा फ्रीज, कपाट, पलंग, इतर अवजड साहित्य तसेच ताडपत्री, रबरी पाईप, नायलॉन चटई इत्यादी अनेक वस्तू होत्या.

हे सर्व अवजड साहित्य अंधेरी भुयारी मार्गालगत नाल्यामध्ये कचरा रोखण्यासाठी लावलेल्या जाळीत अडकले. त्यापाठोपाठ येणारा इतर सर्व कचरा देखील जाळीत अडकला. परिणामी नाल्याचा प्रवाह पुढे न जाता ओसंडून रस्त्यावर आला आणि भुयारी मार्ग तुंबला. हे अवजड साहित्य, तरंगता कचरा आणि त्यावरून पाण्याचा प्रचंड दबाव यामुळे पोलादी जाळी तुटली. दरम्यान, हे सर्व घडत असताना, दुसऱ्या बाजूला पाणी उपसल्यानंतर त्याचा प्रवाह आपल्या भागात सोडण्यात येत असल्याची हरकत घेवून काही स्थानिक नागरिकांनी उदंचन व्यवस्था देखील बंद पाडली. या सगळ्यांचा परिपाक म्हणून सदर परिसरात पाणी साचले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -