Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखMarathi Language : मराठी भाषा टिकविण्याची कसरत...

Marathi Language : मराठी भाषा टिकविण्याची कसरत…

  • नितीन पडते, ठाणे (प.)

मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे तसेच जगभरात ८३ दशलक्षांहून अधिक लोकांमध्ये ती बोलली जाते. मराठी भाषेला समृद्ध साहित्यिक, ग्रंथ, प्राचीन इतिहास आणि कवितांची अतुल्य परंपरा लाभली गेली आहे. बदलत्या काळाप्रमाणे जसजसा भारत विकसनशील देशांकडून विकसित देशांच्या रांगेत येणाच्या शर्यतीत कूच करत असताना, जागतिक व्यवहारात वापरली जाणारी इंग्रजी भाषा आपली पकड सर्वत्र अधिक मजबूत करत आहे. आता मराठी भाषिकांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असताना आता मराठी भाषेच्या भविष्याची चिंता सर्वांना वाटू लागली आहे?

साखर कारखान्यात जशी उसापासून साखर निर्मिती केली जाते त्याचप्रमाणे पूर्वी लहान मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी लावणारा मराठी शाळेच्या रूपातील कारखाना जणू विविध विषयांद्वारे मुलांच्या मनात साखर पेरणी करून मराठी भाषेचा गोडवा वाढवण्याचे काम करायचा. सकाळपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रगीतापासून पसायदान व अभंगांपर्यंत तोंडपाठ असलेली मुले जणू मराठी भाषेचे रक्षक उभे आहेत, असा जणू भास व्हायचा. मातृभाषेतून साहित्य व ग्रंथांची गोडी लावता लावता जणू एका गुरुशिष्याच्या पवित्र नात्याचा जन्म झाला तो फक्त मराठी शाळांमध्येच!

देशात जागतिकीकरणाची सुरुवात होताच महाराष्ट्रातील मराठी शाळांना जणू ग्रहण लागायला सुरुवात झाली. एकेकाळी महाराष्ट्रात मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा अभिमान असणारी लोकांची काळाप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या शर्यतीत पिछेहाट व्हायला सुरुवात झाली. पालकांची इच्छा नसून देखील आपल्या पाल्याला शर्यतीच्या युगात मागे राहू नये म्हणून इंग्रजी शाळांमध्ये मोठ्या देणग्या देऊन प्रवेश घ्यावा लागला आणि मराठी भाषेच्या गळचेपीचा दोर तेथूनच बांधायला सुरुवात झाली. दशकांचा इतिहास असलेल्या व अभिमानाने उभ्या असणाऱ्या मुंबईतील महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळा विद्यार्थ्यांच्या पटसंख्येअभावी तुकड्या कमी होऊन होऊन एक दिवस शाळेलाच कुलूप लावण्याची वेळ आली. सध्या बोटांवर मोजण्या एवढ्या राहिलेल्या मराठी माध्यमांच्या शाळा पटसंख्या कमी होत असल्यामुळे आपला शेवटचा श्वास घेत आहेत. कधीकाळी मुंबईमधील याच मराठी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असणारी मराठी माणसे नक्की गेली तरी कुठे?

देशाची आर्थिक राजधानी बनलेली मायानगरी मुंबई एकेकाळी मराठी माणसाच्या ऐक्याचा व संस्कृतीचा गड म्हणून ओळखला जायचा. हळूहळू या गडाला अनियंत्रित महागाईच्या आक्रमणाने व त्याबरोबर वाढत्या कौटुंबिक वादाने मुंबईच्या या गडावरील मराठा मावळे मुंबईबाहेर विखुरले गेले व काळानुसार अमराठी भाषिकांची पकड मुंबईवर मजबूत होत गेली. या झालेल्या बदलात फक्त मराठी माणूसच मुंबईबाहेर गेला नाही, तर त्याच्यासोबत मराठी शाळा व जुन्या वस्त्या देखील काळाबरोबर पडद्याआड होत गेल्या व मराठी भाषेच्या गळचेपीचा दोर अजून घट्ट होत गेला. अमराठी शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करणे आणि सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा जास्त वापर करण्यास प्रोत्साहन देणे यांसारख्या भाषेच्या संवर्धनासाठी सरकारने पावले उचलत असताना आपणदेखील तेवढाच पाठिंबा देणे गरजेचे आहे. भविष्यात मराठी भाषेच्या जागतिक प्रसारासाठी माहिती तंत्रज्ञानाचा मोठा मोलाचा वाटा असणार आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात लोकांसाठी मराठी साहित्य व पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. विकिपीडिया, गुगल आणि यूट्यूबसारखी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आता मराठीत उपलब्ध करून दिल्यामुळे, भाषेबद्दलची माहिती सुलभ व जलदरीत्या मिळण्यास मदत होते आहे. आपल्या कर्मभूमीवर व तेथील राज्यभाषेवर निर्विवाद प्रेम कसे करावे, हे दाक्षिणात्य अभिनेता शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. रजनीकांत यांचा जन्म हा एका मराठी कुटुंबात झाला असला तरी त्यांनी आपल्या अभिनयाच्या कलेतून दाक्षिणात्य सिनेविश्वाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या या भाषेवरील प्रेमामुळे दाक्षिणात्य भागात त्यांना चाहत्यांकडून देवाचा दर्जा दिला जातो. मुंबईत नोकरी व व्यवसायानिमित्त येणाऱ्या अनेक इतर भाषिकांनी मराठी भाषेला सन्मानाने स्वीकारून त्यावर नि:स्वार्थीपणे प्रेम करावे ही प्रत्येक स्थानिक भूमिपुत्रांची अपेक्षा असते. बदलत्या काळाबरोबर आपण मराठी भाषा वाढवण्यासाठी व भविष्यात टिकवण्यासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काय उपाययोजना करू शकतो यावर मराठी भाषेचे भवितव्य अवलंबून आहे. मराठीचे आधुनिकीकरण करणे ही एक काळाची गरज बनली आहे. आधुनिक मराठीमुळे आपला समृद्ध संस्कृतीचा व साहित्याचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यात व तो टिकवण्यास नक्की मदत होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -