Monday, May 13, 2024
Homeमहत्वाची बातमीअमित शाहांची आज भाजप नेत्यांसोबत मुंबईत बैठक

अमित शाहांची आज भाजप नेत्यांसोबत मुंबईत बैठक

मंत्री चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण

अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

आज मुंबईत भाजप नेत्यांसोबत बैठक, निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार

मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सायंकाळी मुंबईत येणार आहेत. आज सायंकाळी भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण काय आहे, यासोबतच मुंबई महानगर पालिका निवडणुकांसंदर्भात मुंबईत भाजपची काय स्थिती आहे, याचा आढावा अमित शहा या बैठकीत घेणार आहेत.

या बैठकीत अमित शहा ‘मिशन ४५’ आणि ‘मिशन मुंबई’ अंतर्गत भाजपची काय स्थिती आहे याचा आढावा घेणार आहेत.

यानंतर ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथे उद्या हा पुरस्काळ सोहळा पार पडणार आहे. अमित शाहांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान या पुरस्कार सोहळ्याच्या तयारीची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. या कार्यक्रमासाठी १५ ते २० लाख समर्थक येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या रात्री १२ पर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अवजड वाहतूक बंद असणार आहे.

हार्बर रेल्वेमार्गावरील मेगा ब्लॉक रद्द

तर हार्बर रेल्वेमार्गावरील मेगा ब्लॉकदेखील रद्द करण्यात आला आहे. मेनलाईन वर माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर अगोदर जाहीर केल्याप्रमाणे मेगा ब्लॉक राहणार आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापूर दौऱ्यावर

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत येत असताना त्यांच्या अगदी जवळचे असणारे मंत्री चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -