Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेभिवंडीतील वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका; मनपाच्या सुशोभीकरणाचा प्रवाशांना फटका

भिवंडीतील वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका; मनपाच्या सुशोभीकरणाचा प्रवाशांना फटका

मुजोर रिक्षा चालकांमुळे होतेय वाहतूक कोंडी

भिवंडी : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट बनली असून जकात नाका, महापालिकेच्या मुख्यालयासमोरच प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यात वाहतूक विभागाला अपयश येत आहे.

भिवंडी मनपा मुख्यालयाबाहेर व शांतीनगर मार्गाच्या दोन्ही बाजूस मुजोर रिक्षाचालक प्रवाशांना बसण्यासाठी रिक्षा आडव्या लावत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तसेच महापालिका मुख्यालयाच्या समोर असलेल्या शांतीनगर गैबी नगर रस्त्याच्या समोर उड्डाणपुलाखाली करण्यात येत असलेल्या सुशोभिकरणामुळे उड्डाणपुलाखालील रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शांतीनगरकडे जाणारी वाहने जकात नाका येथून विरुद्ध दिशेने येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.

कोट्यावधी रुपये खर्च करून एमएमआरडीएच्या माध्यमातून शांतीनगर, गैबी नगर रस्ता रुंदीकरणासह काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र कोट्यावधी रुपये खर्चूनही सुशोभीकरणच्या नावाने उड्डाणपुलाखालील रस्ता बंद असल्याने वाहन चालकांना शांतीनगरकडे जाताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.

गुरुवारी दुपारी या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडली होती. त्यामुळे ही वाहतूक कोंडी नागरिकांच्या जीवावरच उठली असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. केवळ सुशोभीकरणाचे नाव पुढे करत महानगरपालिका प्रशासन या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -