Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीशिक्षण क्षेत्रातील कार्यकुशल नेतृत्व अंबादास वाजे काळाच्या पडद्याआड

शिक्षण क्षेत्रातील कार्यकुशल नेतृत्व अंबादास वाजे काळाच्या पडद्याआड

सिन्नर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांचे दिनांक आज पहाटे ३ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रातील शिक्षक वर्ग हळहळ व्यक्त करीत आहे.

त्यांनी संघटनेत अविरत केलेल्या कामकाजामुळे ते लोकप्रिय होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुबेरे येथे प्रभारी केंद्रप्रमुख पदावर कार्यरत अंबादास वाजे यांच्या छातीत रात्री साडेदहा वाजता अचानक दुखू लागल्याने त्यांना सिन्नर येथील शिवाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.

वाजे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला पहिला महाराष्ट्र शिक्षक संघाचा अध्यक्ष पदाचा मान मिळाला होता.

शिक्षक, प्रशासन, विद्यार्थी यांच्यातील समन्वयाद्वारे अंबादास वाजे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक गुणवत्ता वाढवत असताना आपल्या कार्य कुशलतेचा ठसा उमटवत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष साधत असताना पालकांबरोबर समन्वय साधण्याचे काम वाजे यांनी केले होते. ज्ञानगंगा ग्रामीण भागातील घराघरात पोहोचवण्याचं काम वाजे यांच्या इच्छाशक्तीतून झालेले दिसते. आदिवासी, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक योजना सुरू करून पालकत्वाची जबाबदारी वाजे यांनी स्वीकारली होती. अत्याधुनिक वाचनालय चळवळीत सहभाग घेऊन पुस्तकांनी मस्तक बदलण्याचे काम वाजे सरांच्या कार्यक्षमतेचे प्रतीक समजण्यात येते.

सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील “शेतकरी कुटुंबात जन्मलेले वाजे, महाराष्ट्र शिक्षक संघाचे शिलेदार साजे’ असे उद्गार साहजिकच सर्वसामान्य जनतेतून त्यांच्या कामाची पावती देऊन जातात.

वयाच्या विसाव्यावर्षी आगासखिंड येथील शाळेतून आपल्या शिक्षिकी पेशाला सुरुवात करणारे वाजे नेतृत्वगुणांच्या कार्यकुशलतेने महाराष्ट्र शिक्षक संघाच्या सर्वोच्च पदावर पोहोचताना सिन्नर तालुक्यातील शाळेचा चेहरा इम्पत्ती फाउंडेशनच्या साह्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा करत आयएसओ मानांकन प्राप्त शाळा निर्माण करण्यावर भर दिला. गुणवत्ता शिस्त अनुशासन शालेय परिसरात निर्माण केली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच लक्ष डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक कार्यात वाजेंचे मोलाचे योगदान होते. अंबादास वाजे यांची सामाजिक कार्याची सुरुवात रोटरी ग्रामविकास व गणेश सार्वजनिक मंडळ डुबेरेच्या माध्यमातून झाली. इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेचे वाढत जाणारे प्रस्थ यामुळे शासकीय शाळेतील ढासळत जाणारा विद्यार्थ्यांचा पट पूर्ववत करण्यासाठी, राज्यातील प्रत्येक शिक्षकाच्या, विद्यार्थ्यांच्या गरजा समोर ठेवून शैक्षणिक धोरणे राबविण्यासाठी व अत्याधुनिक युगातील बदलांना तेवढ्याच निस्वार्थपणे स्वीकारून शैक्षणिक कार्यात झोकून दिलेलं व्यक्तिमत्व वाजेच्या रूपाने नाशिक जिल्ह्याच्या भूमीत पाहायला मिळते.

आदिवासी भागासाठी एक स्तर योजना, शिक्षकांच्या पेन्शन योजना, आंतरजिल्हा बदलीतील समस्या, शालेय अनुदान योजना, शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी पुढाकार घेऊन शासन दरबारी प्रश्न मांडण्यासाठी अंबादास वाजे अग्रेसर राहून ते वंचित घटकाला न्याय देण्यासाठी शासन दरबारी निस्वार्थपणे झटत. तरुण नवीन नेतृत्व निर्माण करण्यासाठी वाव देऊन प्रत्येकाला काम करण्याची संधी शिक्षक संघात वाजे यांच्या हातून होताना दिसत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर आणि कार्यावर संघातील प्रत्येक व्यक्तीला गौरव आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी गौरव केला. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न समोर ठेवून न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यातून दिसून येतो.

शिक्षक नेते संभाजीराव थोरात, माजी आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजाभाऊ वाजे, हरिश्चंद्र देसाई यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा वारसा अंबादास वाजे यांनी चालू ठेवला होता.

खासदार शरदचंद्र पवार, मंत्री स्मृती इराणी, मंत्री दादासाहेब भुसे, विनोद तावडे, वर्षा गायकवाड, सुधीर तांबे, सत्यजित तांबे अशा मान्यवरांसोबत शिक्षण क्षेत्रातील समस्या व आव्हाने या विषयी चर्चा करत वाजे यांनी शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्यासाठी पुढाकार घेतला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -