Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीनोकर भरतीचा 'तो' निर्णय रद्द करण्याची अजित पवारांची मागणी

नोकर भरतीचा ‘तो’ निर्णय रद्द करण्याची अजित पवारांची मागणी

या शासन निर्णयाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊन अंदाजे १ लाख कर्मचारी यामार्फंत नियुक्त करण्याचे प्रस्तावित

मुंबई : जुन्या पेन्शनचा मुद्दा कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात असताना, नेमके याचवेळी बाह्य स्त्रोताद्वारे सरकारी नोकर भरतीचा हा शासन निर्णय काढण्याचे प्रयोजन काय? ७५ हजार कर्मचारी भरतीची प्रक्रिया एका बाजूला सुरु असल्याचे सरकार जाहीर करते आणि दुसऱ्या बाजूला बाहयस्त्रोताद्वारे नियुक्त्या करण्याविषयी शासन निर्णय काढते, सरकारची या मागची नेमकी भूमिका काय, हे स्पष्ट करुन हा शासन निर्णय शासनाने तातडीने रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्था व एजन्सीचे पॅनेल नियुक्ती करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय मंगळवार, १४ मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या पुरवठादारांकडून अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात येणार आहे. जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच सरकारने हा निर्णय घेण्याचे कारण काय? हा प्रश्न निर्माण होतो. तसेच या भरतीमुळे सरकारच्या कामातील गोपनीयतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे, तरी सरकारने बाह्यस्त्रोताद्वारे भरतीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

हे पण वाचा : आता कर्मचारी होणार ‘आऊटसोर्स’! संपकरी टेन्शनमध्ये!

या निर्णयामध्ये खर्च आटोक्यात ठेऊन विकासाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्य असेल तिथे बाह्य यंत्रणेमार्फंत कामे करुन घेण्यासाठी शासनाने हे धोरण अवलंबिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतू या शासन निर्णयात सरसकट सर्व विभागांना बाह्य स्रोताद्वारे भरती करण्याची परवानगी देऊन कंत्राटदारांचाच फायदा शासन करीत आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे. या शासन निर्णयातील परिशिष्टामधील पदे व त्यांचे मासिक वेतन पाहिले असता काही पदांचे वेतन मुख्य सचिवांच्या वेतनापेक्षाही जास्त आहे. या शासन निर्णयाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊन अंदाजे १ लाख कर्मचारी यामार्फंत नियुक्त करण्याचे प्रस्तावित आहे. असेही अजित पवार यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -