Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीAjit Pawar : उपमुख्यमंत्री झाले पण पुण्याचं पालकमंत्री पद सुटतंय की नाही?

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री झाले पण पुण्याचं पालकमंत्री पद सुटतंय की नाही?

पुण्याच्या बैठकांमध्ये चंद्रकांतदादांना मागे टाकून अजितदादाच करतायत नेतृत्व

पुणे : साधारण दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत (NCP) बंड करत अजितदादा (Ajit Pawar) सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून सगळीकडेच अजितदादांची जोरदार हवा आहे. मात्र उपमुख्यमंत्री नव्हे तर अजितदादांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिजे, अशा उलटसुलट चर्चा वारंवार माध्यमांतून होत असतात. पुण्यात (Pune) झेंडावंदनाचा मान अजितदादांना न मिळाल्याच्या गोष्टीवरुनही राजकारण करण्यात आलं. यावर अजितदादांनी समाधानकारक उत्तर दिलं असलं तरी पत्रकार अजितदादांच्या हात धुवून मागे लागले आहेत. अशीच आणखी एक बाब आता समोर आली आहे, त्यामुळे आता अजितदादा पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या जबाबदार्‍या देखील स्वतःच पार पाडतायत की काय, असं चित्र निर्माण झालं आहे.

मागच्या काही आठवड्यांत मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असल्यामुळे अजितदादांनी विकासकामाच्या आढावा बैठका घेतल्या. त्यामुळे अजितदादांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे की काय, अशा चर्चांना उधाण आलं होतं. हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत आता अजितदादांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांना फक्त सभेला बोलावून सगळी सूत्रे स्वतःच हातात घेतल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे अजितदादा उपमुख्यमंत्री झाले असले तरी पुण्याचं पालकमंत्री पद सुटत नाही की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रशासकीय बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रीपद जरी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत आहेत. मागील आठवड्यात अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकांना चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. त्याआधी देखील अजित पवारांनी अशा बैठका घेण्याचा सपाटा लावला होता.

पत्रकारांनी याबाबत विचारलं असता आपण मंत्री असल्याने आपल्याला बैठका घेण्याचा अधिकार आहे असं उत्तर अजितदादांनी दिलं. आज देखील पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून तसाच मेसेज पाठवण्यात आला आहे. या बैठकीला पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांना आमंत्रण असले तरी बैठकीचे नेतृत्त्व अजित पवार करणार आहेत. त्यामुळे सत्तेत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट चंद्रकांत पाटील यांच्यावर कुरघोडी करताना दिसत आहे.

पुण्याचं पालकमंत्री पद नेमकं कोणाकडे?

अजितदादा सत्तेत सहभागी होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात पुण्याचे पालकमंत्री होते. अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाचा भार स्विकारल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. अजित पवार यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तरीही पुण्यात प्रशासकीय बैठका घेणं अजित पवारांनी मात्र कायम ठेवलं आहे. त्यामुळे पुण्याचं पालकमंत्री पद नेमकं कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -