Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीगणेशोत्सवापूर्वीच आवक वाढल्याने फुलांच्या दरात घसरण

गणेशोत्सवापूर्वीच आवक वाढल्याने फुलांच्या दरात घसरण

मुंबई (प्रतिनिधी) : गणेश उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईतील दादर फूल बाजारात फूल खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा फुलांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे फुलांचे दर देखील निम्म्यावर आले आहेत. बाजारात चांगल्या प्रतीचा झेंडू ६० रुपये किलो तर पावसाने भिजलेला झेंडू ४० रुपये किलो असल्याची माहिती आहे. यासोबतच जास्वंद गुलछडी लिली गुलाब या फुलांची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे फुल विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार यंदा गणेश उत्सवासाठी मुंबईकरांना पुरतील एवढी फुलांची आवक बाजारात झाली आहे.

यंदा बाप्पांच्या स्वागतासाठी मुंबईनगरी सज्ज झाली असून बाजारपेठा फुलल्या आहेत. गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीकडे भक्तांची पावले वळली आहेत. गणपती पूजनासाठी चाफा, जास्वंद, दुर्वा, मोगरा, शेवंती फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. कोरोना काळात निर्बंधांमुळे सणांवर निर्बंध होते. मंदिरे बंद होती. परिणामी फूल लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मात्र यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय सण जल्लोषात साजरे होत आहेत. परिणामी सणासुदीला फुलांची मागणी वाढली आहे. गणेशोत्सवात फुलांचे दर वाढल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु दादर फूल मार्केटमध्ये आवक वाढल्याने दर निम्म्यावर आले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर निर्बंध उठवल्यामुळे गणेशोत्सवासाठी ग्राहक फुलांची खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मागणीपेक्षा अधिक फुले बाजारात

मुंबईतील दादर फूल बाजारात विक्रीसाठी येणारी फुले ही पुणे, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यातून येतात. यंदा शेतकऱ्यांनी फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यामुळे मागणीपेक्षा अधिक फुले बाजारात दाखल झाली आहेत. यामुळे बाजारात फुलांचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळते.

दादरच्या मीनाताई ठाकरे फूल मार्केटमध्ये फुलांचे दर

गुलाब : ५० रुपये डझन
झेंडू : ६० रुपये किलो
शेवंती : ६० रुपये किलो
जास्वंद : १५० रुपये शेकडा
दुर्वा : १० रुपये जोडी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -