Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यलग्नाचे वय: कायदे आणखी कडक हवेत

लग्नाचे वय: कायदे आणखी कडक हवेत

मीनाक्षी जगदाळे

वास्तविक पाहता १८ वय हे मुलींची विचारशक्ती, बुद्धिमत्ता, शिक्षण, शारीरिक, मानसिक परिपूर्ण वाढ पूर्ण होऊन त्या लग्नासाठी व त्या अानुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी परिपूर्ण तयार झालेल्या नसतात. आजही आपल्या समाजात मुली या कुटुंबाची जबाबदारी अथवा बोजा समजल्या जातात. त्यामुळे अनेक पालक केवळ मुलगी वयात आली म्हणून तिला जमेल त्या ठिकाणी लग्न लावून देण्यात तत्परता दाखवतात.

लींच्या लग्नाचं कायदेशीर वय वाढवणे खूप महत्त्वाची बाब आहे. याला दुसरे एक संवेदनशील कारण म्हणजे, अनेक मुली शाळा-महाविद्यालयांमध्ये असताना प्रेमप्रकरण करतात. भविष्याचे व्यवस्थित नियोजन करून, शिक्षण पूर्ण होऊन, स्वतःच्या पायावर उभे राहून, पालकांना विश्वासात घेऊन या प्रेमाचे लग्नात रूपांतर करावे, इतका संयम किंवा इतकी दूरदृष्टी या वयात नसते. त्यामुळे कधी एकदा आपली अठरा वर्षे पूर्ण होतात आणि पालकांपासून लपवून रजिस्टर लग्न करून घेतो, अशी प्रचंड घाई या मुलींना असते. अशा वेळी पालकांना हे प्रेमप्रकरण समजल्यावर त्यांनी जरी विरोध केला, पोलीस कम्प्लेंट केली, समुपदेशनाची मदत घेतली अथवा वकिली सल्ला घेतला, तरी कायदेशीर दृष्टीने मुलगी सज्ञान असल्यामुळे कोणीही काहीच करू शकत नाही. शेवटी मुलगी आणि तिचं नशीब या तात्पर्यावर येऊन सगळेच विषय सोडून देतात.

पण अठराव्या वर्षी कोणतीही मुलगी इतकी परिपूर्ण, समजूतदार नक्कीच नसते की, ती आयुष्याचा जोडीदार निवडू शकेल. अशा लग्नात भविष्यात समस्याच उद्भवतात. एक तर असे लग्न कालांतराने मोडकळीस येते अथवा आयुष्यभर आहे, ती परिस्थिती स्वीकारून तडजोड करणे भाग पडते. यामध्ये सर्वात जास्त हानी मुलीच्याच आयुष्याची होते. बहुतांश वेळी माहेरचा आधार तुटलेला असतो, ज्याच्यावर प्रेम केलं तो लग्नानंतर बदलतो, अनेकदा तोच आर्थिक दृष्टीने सक्षम नसल्याने त्याच्या आई-वडिलांपुढे हात पसरत असतो. लग्नानंतर समजते की, प्रेमात असताना त्याने जी काही स्वप्नं दाखवली होती, त्यापेक्षा वास्तव खूप वेगळे आहे.

मुलगाच पुरेसा सक्षम, शिकलेला आणि सेटल नसल्याने लग्न करून आणलेल्या मुलीसाठी पालकांच्या विरोधात पण जाऊ शकत नाही आणि त्याच्या घरचे पण मनापासून हे लग्न स्वीकारतील की नाही, याची शाश्वती नसते. त्यामुळे केवळ कायदेशीर मान्यता आहे, आपल्याला आता कोणीच अडवू शकत नाही, आपण सज्ञान झालो आहोत, म्हणून अठराव्या वर्षी पळून जाऊन अथवा लपून प्रियकरासोबत लग्न करणे म्हणजे स्वतःचे आयुष्य पणाला लावून, प्रचंड मोठी जोखीम मुली स्वीकारताना दिसतात.

यासारख्या घटनांना जर पायबंद घालायचा असेल, तर प्रथम मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय वाढविणे क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी या नियमाची अंमलबजावणी होण्याकरिता मुलीच्या लग्नपत्रिकेसोबत मुलीच्या आणि मुलाचा जन्म दाखला, इतर शासकीय कागदपत्रे संबंधित ठिकाणच्या शासकीय विभागाला देऊन त्याची रितसर परवानगी घेणे सक्तीचे करणे आवश्यक आहे. कोणत्याही ठिकाणी मुलीचा जबरदस्तीने अल्पवयात विवाह लावण्यात येत असेल, तर त्याची तक्रार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हेल्पलाइन नंबर, तक्रार कक्ष असणे आवश्यक आहे.

मंदिरे, आश्रम, ट्रस्ट, सामाजिक अथवा सेवाभावी संस्था-संघटना, मंगल कार्यालये, हॉल, लॉन अशा ज्या-ज्या ठिकाणी ठरवून अथवा घरातून पळून आलेल्यांची लग्नं लावली जातात, त्या ठिकाणच्या अधिकारी, कर्मचारी यांना देखील संबंधित मुला-मुलींचा जन्म दाखला पाहून आणि पडताळूनच लग्न लावण्याची परवानगी द्यावी. या संदर्भातले शासन नियम जोपर्यंत कडक होणार नाहीत, तोपर्यंत आपल्या समाजात अशा प्रथांचे उच्चाटन होणार नाही.
meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -