Friday, June 14, 2024
Homeताज्या घडामोडीHaryana chief minister : मनोहरलाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर 'हे' होणार हरियाणाचे नवे...

Haryana chief minister : मनोहरलाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर ‘हे’ होणार हरियाणाचे नवे मुख्यमंत्री!

भाजपच्या बैठकीत झाला निर्णय

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) हरियाणामध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी (Haryana Politics) झाल्याचे पाहायला मिळत आहे. हरियाणात भाजप-जेजेपी (BJP-JJP) युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar lal Khattar) आपल्या मंत्रिमंडळासह राजभवनात पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा (Resignation) राज्यपालांकडे सुपूर्द केला. यानंतर झालेल्या भाजपच्या बैठकीत हरियाणाच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपकडून नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) यांच्या नावावर एकमत झाले असून आज पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.

मनोहरलाल खट्टर यांनी आज सकाळी जवळपास ११ वाजता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चंदीगढमध्ये संभाव्य मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजप नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये कृषिमंत्री अर्जुन मुंडा आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग उपस्थित होते. यावेळी कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांच्या नावावर एकमत झाले.

नायब सिंह सैनी यांची निवड सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रत्येक राज्यात जात आणि ओबीसी समीकरणांवर भाजपचे असणारे लक्ष केंद्रित करते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकांनंतर भाजपने अशाच हालचाली केल्या आहेत, ज्यात ओबीसी चेहऱ्यांसह पदावर किंवा उच्च-प्रोफाइल निवडी बदलल्या आहेत.

कशी तुटली भाजप-जेजेपी युती?

हरियाणाच्या विधानसभेत एकूण ९० आमदार असल्याने बहुमतासाठी ४६ मतांची गरज असते. भाजपाकडे ४१ आमदार होते व त्यांच्यासह जननायक जनता पार्टी (JJP) या दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाचे १० आमदार निवडून आले होते. त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि युती केली. हरियाणा नॅशनल लोकदल पार्टी या एकमेव आमदार असलेल्या पार्टीनेदेखील भाजपाला पाठिंबा दिला. यासह सात अपक्ष आमदारांचाही भाजपाला पाठिंबा होता. अशा प्रकारे बहुमताचं सरकार होतं.

मात्र जेजेपीने लोकसभेसाठी आपल्याला काही जागा मिळाव्यात अशी मागणी भाजपाकडे केली. भाजपाने ती मागणी मान्य केली नाही. त्यानंतर दुष्यंत चौटाला यांनी त्यांच्या आमदारांची दिल्लीत बैठक बोलावली होती. मात्र, त्यांच्याच पक्षाचे अनेक आमदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यानच्या काळात, आज सकाळी भाजपनेच थेट आपल्या सरकारचा राजीनामा दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -