ही हत्या नव्हे तर आत्महत्या असा आरोपीचा दावा
मीरा रोड : मीरा रोडच्या गीता नगर भागातील एका फ्लॅट मध्ये ५६ वर्षीय मनोज सहानेने आपल्या ३२ वर्षीय लिव्ह इन पार्टनर सरस्वतीचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आरोपी मनोज सहानेची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तो भलतेच दावे करत सुटला आहे. ही हत्या नव्हे तर सरस्वतीने आत्महत्या केल्याचे तो म्हणाला. मी एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याने आमच्यात वाद होत होते असाही त्याने दावा केला आहे.
आरोपी मनोजनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आपण आपल्या लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केलीच नाही तर तिने आत्महत्या केली, असं तो म्हणाला. यात पोलीस त्यालाच जबाबदार धरतील अशी भीती वाटल्याने त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावायचं ठरवलं. त्याने मृतदेहाचे तुकडे करुन ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून आणि मिक्सरमध्ये वाटून कुत्र्याला खायला घातले. यानंतर आपण स्वतःही आत्महत्या करणार होतो, असं तो म्हणाला. या कृत्याबाबत आपल्याला पश्चात्ताप वाटत नसल्याचे त्याने कबूल केले. आरोपी मनोज म्हणाला, की तो एचआयव्ही पॉझिटीव्ह आहे. यावरुन दोघांमध्ये खटके उडत. तसंच मृत सरस्वती आपल्याला मामा म्हणत होती, असाही दावा त्याने केला आहे.
याबाबत आरोपी हत्येच्या आरोपांसाठी वेगवेगळे दावे करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असावा, असं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपी चौकशीत अनेक दावे करत आहे, सतत आपला जवाब बदलत आहे, त्यामुळे त्याच्या चौकशीतून आलेल्या प्रत्येक गोष्टीचा तपास केला जाईल, असं पोलीस म्हणाले. मेडिकल आणि पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आल्यावर याप्रकरणी स्पष्टता येईल, असं पोलिसांचं मत आहे.