Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीजिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरप्रकारात गुन्हेगारांना अभय

जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरप्रकारात गुन्हेगारांना अभय

प्रशासकीय अधिकाऱ्यांसह क्लार्कवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रहारची मागणी

नाशिक : जिल्हा रुग्णालयात लाडपागे समितीच्या शासन निर्णयानुसार वर्ग चार सेवा निवृत्त कर्मचारी श्रीमती जिजाबाई गायकवाड यांनी त्यांची सेवा पुस्तकातील गोंधळी समाजाची जात लपवून २०१८ साली झाड गल्ली १२ (अजा) समाजाचा बोगस दाखला मिळवून त्याचा वारस म्हणून मानलेल्या मुलाला म्हणजेच मिलिंद पवार यास नोकरी दिली होती. हे प्रकरण दै. प्रहार आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रकाशझोतात आणल्यानंतर बोगस जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी मिळवलेल्या उमेदवाराला सेवामुक्त करण्याची तत्परता जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दाखवली. मात्र या जात प्रमाणपत्र गैर प्रकारातील मूळ स्रोत असलेल्या चतुर्थ श्रेणी सेवा निवृत्त महिला कर्मचाऱ्याला मात्र अभय दिले जात असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात बनावट जात प्रमाणपत्रावर नोकरी मिळविण्यास उमेदवाराला ज्यांनी उद्युक्त केले त्या महिला कर्मचारी आणि हे जात प्रमाणपत्र खोटे आहे. याविषयी माहिती असूनही प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित क्लार्क यांच्यावर जबाबदारी निश्चित करून फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आणि न्यायसंगत होते. मात्र या प्रकरणात ज्यांनी कागदपत्राची पडताळणी करणे अपेक्षित होते त्यांनीच जाणते अजाणतेपणी दुर्लक्षित केले, या प्रकरणात प्रथम दर्शनी प्रशासन अधिकारी आणि क्लार्क हे दोषी दिसत असतांना केवळ त्यांना वाचविण्यासाठी या गैरप्रकारातील मूळ स्रोत असलेल्या वर्ग चारच्या मूळ दोषी महिला कर्मचाऱ्याला अभय दिले जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्या महिला कर्मचाऱ्यावर खोटे दस्त तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवून फौजदारी गुन्हा दाखल केला तर तत्कालीन प्रशासकीय अधिकारी आणि क्लार्कशी संशयितांचे हितसंबंध प्रकाशझोतात येतील आणि त्यांच्यावरही जबाबदारी निश्चित करून गुन्हा दाखल करावा लागेल या भीतीपोटीच त्या महिला कर्मचाऱ्याच्या अक्षम्य गंभीर चुकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वर्तुळात सुरु आहे.

ही चर्चा लक्षात घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाने देखील त्या संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

“जिजाबाई गायकवाड यांनी तो बोगस दाखला देऊन शासनाची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर कुठलीही कारवाई जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने केली नाही. आयुष्यभर गोंधळी समाज दाखला देऊन नोकरी करणाऱ्या जिजाबाई यांनी रिटायर झाल्यावर झाड गल्ली १२ (अजा) जातीचा बोगस दाखला देऊन शासनाची फसवणूक केली आहे. तरी आपण त्यांचेवर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना मिळणारी पेन्शन त्वरित बंद करावी. कारण गेली पाच वर्ष त्या शासनाची फसवणूक करत आहे.तसेच मिलिंद पवार यांचे कडून २०१८ ते आज पावतो त्यांना दिलेले वेतन व भत्ते सर्व वसूल करण्यात यावे. व त्याचप्रमाणे जिजाबाई ह्या गोंधळी समाजाच्या आहेत हे माहीत असताना सुद्धा त्यांच्या बोगस दाखल्याला ग्राह्य धरून त्यांच्या मानलेल्या वारसास नोकरी देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व्हि. डी. पाटील व संबंधित क्लार्क स्वप्नील चौधरी यांच्यावर सुद्धा शासनाची दिशाभूल व फसवणूक केली म्हणून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून शासनाचे पाच वर्षाचे झालेले नुकसान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात यावे.” – अनिल भडांगे, जिल्हा अध्यक्ष, प्रहार जनशक्ती

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -