Sunday, June 16, 2024

घरातले नंदनवन…

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, “Take care of pennies and pound will take care of itself.” त्याचप्रमाणे निसर्गनियमांची काळजी घेतली, तर परमेश्वराच्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित होईल. लोक देवाला प्रसन्न करण्यासाठी काय काय करतात अभिषेक, उपास- तापास, पूजा-पाठ सर्व काही करतात. देवाची कृपा होण्यासाठी व देवाचा कोप टाळण्यासाठी नागबळी, काळसर्पयोग वगैरे अनेक गोष्टी लोक करतात. मात्र खरा संबंध आहे, तो आपण जे कर्म करतो, त्या कर्माचा. या कर्माच्या आणि निसर्गनियमांच्या मीलनातून आपली नियती निर्माण होते व ती नियती आपल्याच सुख-दुःखाला कारणीभूत ठरते, हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत जर लक्षात ठेवला, तर जीवनातले सगळे प्रश्न सुटतील. आपले विचार नेहमी चांगले, सुख देणारे असले पाहिजेत. आपण जेव्हा दुसऱ्याला दुःख देतो, तेव्हा ते प्रतिसाद अनेक पटींनी परत येतात.

उदाहरण द्यायचे झालेच, तर एखादी सासू सुनेला छळेल, तर त्याचा परिणाम संबंध घरावर कुटुंबावर होतो. सासू सुनेला छळते, तेव्हा त्या सुनेच्या मनावर परिणाम होतो. हळूहळू तिच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसू लागतो व शरीरप्रकृती बिघडत जाते. आपल्या पत्नीला आपली आई त्रास देते, हे कुठल्या पतीला आवडेल; पण आईला कसे बोलायचे म्हणून तो बोलत नाही. माझे म्हणणे असे की, आईचे चुकत असेल, तर मुलाने तसे आईला सांगितले पाहिजे. पुष्कळ वेळा मुले आईच्या इतक्या आहारी गेलेली असतात की, ते तिला बोलायला धजत नाहीत, त्यामुळे सासूचे तिथे फावते. सुनेचा छळ करण्यामागे अनेक कारणे असू शकतात. हुंडा आणला नाही, मनासारखे वागणे नाही इत्यादी. अशा कारणांसाठी सासू जेव्हा सुनेचा छळ करते, तेव्हा त्याचा परिणाम तिच्या मुलावरही होत असतो. तो आईला काही बोलू शकत नसला, तरी तो आतल्या आत घुसमटत असतो. त्याच्या शरीरावरही याचा परिणाम होतो. त्याला डॉक्टरकडे जावे लागते. तिथे गेल्यावर खिशातले पैसे जातात. अर्थात तो डॉक्टरचा दोष नसतो, तर ते त्यांचे काम असते. आपण डॉक्टरांकडे जातो, ते आपल्याला बरे वाटावे म्हणून. सांगायचा मुद्दा हा की, सुनेला त्रास होतो, मुलाच्या प्रकृतीवर परिणाम होतो, घरातल्या मुलांवर कूसंस्कार होतात. असे करता करता कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त होते. याउलट सासूने सुनेला मुलीसारखे वागवायला सुरुवात केली, तर चांगले परिणाम होतील. दोष हे सर्वांकडे असतात. जगातला एक तरी माणूस असा दाखवा की, ज्याच्याकडे एकही दोष नाही. जगातल्या प्रत्येकाकडे थोडेफार दोष असतातच म्हणून सर्वगुणसंपन्न असा माणूस दाखवता येणे शक्य नाही.

सुनेकडे असे दोष सापडले, तर त्यावर बोट ठेवायचे व तिचा छळ करायचा हे शहाणपणाचे लक्षण नाही, कारण या कृतीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणून अशावेळी काही दोषांकडे दुर्लक्ष करायचे. अशा परिस्थितीमध्ये सुख मिळवायचा एकमेव मार्ग म्हणजे दुसऱ्याला सुख द्या. महत्त्वाची गोष्ट अशी की, जीवनात मी आधी सुख दिले पाहिजे, सुख हे मानण्यात नाही. सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही, तर सुख हे देण्यात आहे. कारण तुम्ही जे सुख इतरांना द्याल, तेच सुख आपल्याला चांगल्या कामातून कधी ना कधी मिळेल. किती महत्त्वाचा सिद्धांत आहे हा? हा सिद्धांत प्रत्येक घरात जपला, तर घराचे नंदनवन व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -