- अब्दुल सत्तार, कृषिमंत्री
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जातात. एक आक्रमक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पण या कणखर नेतृत्वाच्या जवळ गेल्यानंतर ते किती हळवे आहेत, याची प्रचिती येते. लहान-सहान प्रसंगातून त्यांचे आभाळाएवढे मोठेपण दिसून येते. म्हणूनच त्यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी लोकांची वर्दळ असते. ते जिथे जातील, तिथे माणसांचे मोहोळ तयार होते.
समाजाची तळमळ असणारे राजकीय नेते, रंजल्या-गांजलेल्यांचे प्रश्न मांडणारे जागरूक लोकप्रतिनिधी, आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करून अडचणीत सापडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे मुख्यमंत्री, कलाकारांना प्रोत्साहन देणारे रसिक आणि घरातील प्रत्येकाची काळजी घेणारे कुटुंबप्रमुख, अशी त्यांची अनेक रूपे मला जवळून मला पाहता आली.
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे समीकरण घेऊन वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण देशात अवघ्या ७ महिन्यांत एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून नावलोकिक मिळविला आहे. महाराष्ट्रात जुलै २०२२ मध्ये “शिंदे-फडणवीस” सरकार सत्तेवर आले अन् एक नवे नेतृत्व महाराष्ट्राला प्राप्त झाले. एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. अन्याय करणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण असणाऱ्या शिंदे साहेबांनी राज्यातील जनतेला हवे असणारे सरकार देण्यासाठी पुढाकार घेतला. एक ऐतिहासिक उठाव करून राज्याचा हितासाठी शिवसेनेची नैसर्गिक युती असलेल्या भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले.
कणखर, संयमी व सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने एकनाथ शिंदे साहेबांनी चालविलेला कारभार भल्याभल्या राजकारण्यांना अचंबित करणारा ठरला. या सरकारने जनतेला दिलेला दिलासा, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना विक्रमी वेळेत दिलेली मदत यामुळे काही महिन्यांतच शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले.
शेतकऱ्यांना मदत करण्यास सदैव तयार निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या वर्षी बळीराजा पुरता अडचणीत आला होता. अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि दररोज पिकांवर येणाऱ्या निरनिराळ्या रोगांमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला होता. माझ्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर मी विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्राच्या नुकसानग्रस्त भागाचे दौरे करून परिस्थिती जाणून घेतली. मी शेतकऱ्यांची व्यथा आमचे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांजवळ मांडली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. स्वातंत्र्यानंतर किंवा राज्याच्या निर्मितीनंतर इतक्या विक्रमी वेळेत मदत जाहीर होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती.
हाकेला प्रतिसाद देणारा नेता
मी यापूर्वीही अनेक मंत्रीपद भूषवली आहेत. मात्र मतदारसंघात कोणत्याही कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निमंत्रण दिले. त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून समाजहिताच्या कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली. एवढेच नव्हे, तर प्रत्येक वेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस काहीतरी भरीव मदत जाहीर करून ते गेले. त्यामुळे मी ज्यावेळी त्यांना मदतीसाठी आर्जवं केली. त्यावेळी त्यांनी त्याला प्रतिसाद देत माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिले. त्यामुळे अशा सर्वसामान्यांचे हित जपणारा नेत्याच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणे मी माझे भाग्यच समजतो. अशा या विकासाच्या महामेरू असणाऱ्या आमच्या कुटुंबप्रमुखास आजच्या वाढदिवसाच्या उदंड आणि निरोगी आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा…!!!