Sunday, May 19, 2024

एक निर्णय

  • क्राइम: अ‍ॅड. रिया करंजकर

अनूला सर्व समजलं, सुशांतच्या आईने अनूच्या आईचा रूम मागायला सुरुवात केली. नाही तर माहेरी जा, असं सांगितलं.

अनू सासू-सासरे व नवरा यांच्या त्रासाला कंटाळून आज ती आपल्या आईच्या सोबत राहत आहे. लग्न होऊन एका वर्षात ती आपल्या आईकडे आलेली होती. अनूचं लग्न हे नात्यात झालेलं होतं. आतेभावाशी तिचं लग्न झालेलं होतं. अनू ही आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील बीएमसीमध्ये कार्यरत होते. अनू एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं होतं की, पुढे आम्ही नवरा बायको नसलो, तर ती स्वतःच्या पायावर उभी राहील. हा विचार तिच्या वडिलांनी केला होता. म्हणून त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता तिला कधीही भासू दिली नाही.

अनू आणि तिच्या आई-वडिलांचे तिघांचं आयुष्य सुखी-समाधानी असं चाललेलं होतं. पण अचानक एक दिवस सर्व होत्याचं नव्हतं असं झालं. अनूच्या वडिलांना अटॅक आला व त्यात त्यांचे निधन झालं. ज्या मुलीला दुःख म्हणजे काय माहीत नव्हतं, त्या मुलीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. अनूची आई अनूकडे बघून स्वतःला सावरत होती. आपल्याला काय झालं, तर आपली मुलगी वाऱ्यावर पडेल. याची चिंता तिला लागून होती. थोड्या दिवसांनी मायलेकी स्वतः सावरू लागले. तर नातेवाइकांनी तगादा लावला की, “अनूचं लग्न करा. वर्षाच्या आत लग्न झालेलं चांगलं असतं, नाहीतर तीन वर्ष तुम्हाला थांबावं लागेल.” अनूच्या आईला काही समजेना कारण कर्ता पुरुषच नाही, तर निर्णय कोण घेणार? मग अनूची आत्या तिच्या आईच्या मागे लागली. माझा मुलगा आहे माझ्या मुलाला मी सून म्हणून तुमची अनू करून घेते. अनूच्या आईला नात्यात देणं योग्य वाटत नव्हतं. तिने हा विचार केला. जर नात्यातच मुलगी दिली, तर तिची आत्या अनूला व तिला सांभाळून घेईल. एक आधार मिळेल, असा विचार अनूच्या आईच्या मनात येऊ लागला. अनूला एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं. पण नातेवाईक आणि आईच्या विनवण्यांना ती बळी पडली व लग्नासाठी तयार झाली.
अनूची तिच्या वडिलांच्या नोकरीच्या जागेवर लागण्याची खटपट सुरू होती. वडिलांच्या जागेवर लागण्याचे प्रोसिजर अनूने सुरू केलेली होती. काही दिवसांत लग्न येऊन ठेपलेलं होतं. तिच्या आत्याने विषय काढला की, अनूला नोकरी लावण्याऐवजी माझ्या भावाची नोकरी माझ्या मुलाला लावूया. शेवटी अनूचं लग्न त्याच्याच बरोबर होणार आहे, अनूने नोकरी केली काय, त्यांनी नोकरी केली काय एकच, असे म्हणून अनू कामाला जायला लागली, तर तिला घर आणि नोकरी सांभाळून त्रास होईल, तिला ते जमणार नाही. असं आत्या बोलू लागली. तीच नोकरी माझ्या मुलाला म्हणजे अनूच्या होणाऱ्या नवऱ्याला दिलीत, तर ती पुढील आयुष्य आरामात राहील. असं आत्या अनू आणि तिच्या आईला म्हणू लागली. अनूला हे पटत नव्हतं की, आपल्या वडिलांची नोकरी होणाऱ्या नवऱ्याला लावायची. त्याने त्यांच्यामागे तगादाच लावला होता आणि लग्नपत्रिका तर सर्वत्र वाटून झालेली होती. म्हणून अनूची आई म्हणाली, ‘तुझ्या नवऱ्याला नोकरी लागली, तर तू आरामात आयुष्य जगशील.’ असं तिला म्हणायला लागली. शेवटी अनूने निर्णय घेतला की, आपल्या वडिलांची नोकरी होणाऱ्या नवऱ्याला द्यायची. हाच तिचा निर्णय तिच्यावर घातक ठरला.

आपल्या पुढ्यात वाढलेलं ताट न जेवता. भरलेलं ताट दुसऱ्याला देणं आणि आपण उपाशी राहणं अशी परिस्थिती तिच्या वाट्याला आली. अनूचं थाटामाटात लग्न झालं व ती सासरी नांदायला गेली. आणि काही काळानंतर अनूचा नवरा सुशांत याला अनूच्या वडिलांच्या जागेवर बीएमसीमध्ये नोकरी मिळाली. अनूच्या आयुष्यामध्ये लग्नानंतर चांगलं आयुष्य चाललेलं होतं. तिच्या वडिलांच्या जाण्याने जे दुःख तिच्या आयुष्यात आलं होतं. ते आता कुठेतरी कमी होऊ लागलेलं होतं. सहा महिने गेल्यानंतर सुशांतची आई अनूच्या आईला त्यांचा राहत असलेला फ्लॅट सुशांत नावावर करायला सांगू लागली. अनूच्या नावावर केला तरी तो सुशांत आणि अनूचाच असणार आहे आणि सुशांतच्या नावावर केला तरी सुशांत आणि अनूचाच असणार आहे, असं यावेळी ती बोलू लागली. त्यावेळी अनूला कुठेतरी या गोष्टी खटकल्या. तिने सरळ या गोष्टीला नकार दिला. त्यावेळी सुशांत, अनू आणि त्याच्या घरातील लोकांशी अनूचे हळूहळू वाद होऊ लागले. आणि त्याच वेळी अनूला सुशांतचे एका मुलीशी प्रेमप्रकरण असल्याचे समजले. सुशांत याने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण तिला सत्यपरिस्थिती समजून चुकलेली होती. सुशांत आणि त्या मुलीचं लग्नाच्या अगोदरपासून प्रेमप्रकरण होतं. सुशांत हा अनूशी लग्न करायला तयार नव्हता. पण सुशांतच्या आईने त्याच्यावर जबरदस्ती करून हे लग्न लादलेलं होतं. अनूशी लग्न कर म्हणजे तुला बीएमसीची नोकरी लागेल, ती तुला मिळेल आणि मग तिला घरातून कसं काढायचं? ते मी बघीन, असं तिने सुशांतला सांगितलेलं होतं.त्यांना कोणाचाही आधार नाही त्यामुळे ते काही करू शकत नाहीत. असं त्यांच्या आईने त्याला सांगितलं होतं. अनूला घरातून बाहेर काढून तुझं ज्या मुलीशी प्रेम आहे, त्या मुलीशी लग्न लावून देईन, असं तिने सांगितलेलं होतं.
आता हे सर्व अनूला समजलेलं होतं आणि आता, तर सुशांतच्या आईने अनूच्या आईच्या नावावरचा रूम मागायला सुरुवात केलेली होती. नाही तर तू तुझ्या माहेरी जा. असं तिला ठणकावून सांगितलं जात होतं. त्यांच्या आईला वाटलं की, जसं आपण अनूच्या वडिलांची नोकरी आपल्या मुलासाठी मिळवलेली आहे, तसा रूमही आपल्या मुलाला मिळेल. अशा गैरसमजात ती होती. ती हे विसरली होती की, अनूने भावनेच्या भरात स्वतःला लागणारी नोकरी होणाऱ्या नवऱ्याला दिली. पण अनूच्या वडिलांनी तिला सुशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे शिक्षण दिलेले होते. ही गोष्ट सुशांतची आई विसरलेली होती. अनूला जो मानसिक त्रास दिला जात होता व तिच्यावर जो अन्याय केला गेला होता व तिला फसवून तिच्याशी लग्न केलं होतं, या गोष्टीविरुद्ध तिने आवाज उठवण्याचं ठरवलं आणि त्यासाठी तिने आपल्या पतीचे घर सोडून आपल्या आईच्या घरी येऊन ती राहू लागली. अनूच्या आईला आपली किती मोठी फसवणूक झालेली आहे, हे आता समजलेलं होतं. सुशांतला नोकरी देऊन एक निर्णय किती मोठा फसलेला होता, हे आता मायलेकींना समजलेलं होतं. याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी या मायलेकी स्वतःची हिंमत आणि अनू स्वतःचे कायदेशीर हक्क वापरण्यासाठी आता कायदेशीर लढा देत आहे.

(सत्य घटनेवर आधारित.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -