Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीमतदार नाव नोंदणी आणि चुका सुधारण्याची संधी!

मतदार नाव नोंदणी आणि चुका सुधारण्याची संधी!

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी मतदारयादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे. मतदारांनी मतदारयादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline Mobile App वर तसेच मतदार मदत क्रमांक १९५० यावर संपर्क करावा. तसेच याबाबत काही अडचणी येत असतील, तर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मतदारांसाठी मतदार हेल्पलाइन क्रमांक ०२२२०८२२६९३ सुरू करण्यात आला आहे. मतदारांनी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव केले आहे.

निवडणूक आयोगाने जानेवारी महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. तथापि, मतदान उमेदवारांसाठी नामांकन दाखल करण्याच्या अंतिम मुदतीच्या १० दिवस आधीपर्यंत मतदार संघात नावनोंदणी सुरू राहील. याचा अर्थ मुंबईसाठी, मतदार नोंदणी २३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

शहरातील महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी वाढविण्यासाठी शासन मोहीम राबवत आहे. मतदानाच्या दिवशी १८-१९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या २५,००० पर्यंत नेण्याचे आमचे ध्येय आहे, असे मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

मतदार नाव नोंदणी २३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे, मतदार दुसऱ्या शहरात राहत असल्यास ते मतदारसंघ बदलू शकतात. नाव आणि पत्त्यातील चुका दुरुस्त करता येतील. नाव दुसऱ्या भाषेत असेल तर, नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर एखाद्या मतदाराला त्यांचे नाव स्थानिक भाषेव्यतिरिक्त अन्य प्रादेशिक भाषेत आढळल्यास, त्यांना ते दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या हेल्पलाइनवर कॉल करावा लागेल. मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) याला संबोधित करतील.

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यादव यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात `३०-मुंबई दक्षिण मध्य`, `३१-मुंबई दक्षिण` हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ५९ हजार ४४३ मतदार असून जिल्ह्यात दिनांक २० मे २०२४ (सोमवार) रोजी मतदान होणार आहे. तर दिनांक ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी मतमोजणी होणार आहे. तरी, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क येत्या २० मे २०२४ रोजी आवर्जून बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

National Grievance Service Portal (NGSP) पोर्टल

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर मुंबई शहर जिल्ह्यातील दि. १६ मार्च ते दि. ३१ मार्च २०२४ या कालावधीत मतदार नोंदणीशी संबंधित एकूण ४६१ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी १५३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित ३०८ तक्रारी या मतदान नोंदणीशी संबंधित नसल्यामुळे त्या निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

यादव म्हणाले की, भारत निवडणूक आयोग यांनी National Grievance Service Portal (NGSP) हे नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात.

c-Vigil मोबाईल ॲप

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigil हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये दक्ष नागरिकाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे सदर ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. cVigil या मोबाईल ॲपवर दि. १६ मार्च ते दि. २ एप्रिल २०२४ या कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता उल्लंघनासंदर्भात एकूण ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या सर्व ४० तक्रारींचे निराकरण तातडीने करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -