Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीराऊतांचे पार्टनर सुजीत पाटकर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

राऊतांचे पार्टनर सुजीत पाटकर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा, कंपनीही बोगस

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांचे बिझनेस पार्टनर सुजीत पाटकर यांच्याविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजीत पाटकर आणि अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीने कोविड सेंटरचे कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. पुरेशी क्षमता नसल्याने अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा गौप्यस्फोट करत कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत हे भागिदार असलेली लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वातच नाही. तरीही कोविड सेंटरचे कंत्राट या कंपनीला देऊन तब्बल शंभर कोटींचा जम्बो कोविड घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट करत काही गोष्टी मांडल्या होत्या.

किरीट सोमय्या ट्वीटमध्ये म्हणाले होते की, “शिवसेना खासदार संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वातच नाही. परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी एनएससीआय, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. या कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून या कंपनीने शंभर कोटी रूपयांचा जम्बो कोविड घोटाळा केला आहे.”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच, त्यांनी या घोटाळ्याची चौकशी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ऑथरिटीने (एनडीएमए) करावी, अशी मागणी केली होती.

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांची काही दिवसांपूर्वी ईडीनं चौकशी केली आहे. स्वप्ना पाटकर या सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांनी घटस्फोट घेतला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीसाठी हजेरी लावली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -