Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीनारळावरची पैज

नारळावरची पैज

रोहित गुरव

मुंबई : नारळी पौर्णिमा जसजशी जवळ येते तशी वरळी कोळीवाडा परिसरात नारळावरच्या पैजा रंगायला लागतात. एक आठवडा आधीच येथे नारळी पौणिमेचे वातावरण सेट व्हायला सुरुवात होते. शाळेतल्या मुलांपासून तरुण मंडळी एकमेकांचा नारळ फोडण्यासाठी उत्सुक असतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मोठमोठ्या पैजांनी या सणाचा शेवट होतो.
वरळी कोळीवाडा परिसरात कोळी, आगरी बांधव मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. समुद्राच्या किनाऱ्यालगत ही वस्ती असून मराठी भाषिक मुळचे आणि बहुसंख्य असल्याने हिंदू सणांचा उत्साह येथे न्याराच असतो.

एक आठावडा आधीच येथे नारळी पौर्णिमेची चाहूल लागायला सुरुवात होते. नाक्यानाक्यावर नारळाचे स्टॉल उभारले जातात. मग लहान मंडळी एकमेकांचा नारळ फोडून तो जिंकण्याच्या प्रयत्नात असतात. मिळालेले नारळ जमा करून घरी नेले जातात किंवा तेथेच गृहिणींना विकले जातात. या पैजांना खरी मजा रंगते ती नारळी पौर्णिमेच्या दिवशी. पन्नास-पन्नास नारळांच्या किंवा त्यापेक्षाही मोठ्या पैजा होतात. एका फटक्यातच दुसऱ्याच्या नारळातले पाणी काढले जाते. त्यातूनच एखाद्याचा नारळ वाचला तर नशीबच; पण पुढच्याच फटक्याला नारळाचे तुकडेच समजा. कुणाचा फटका भारी, कुणाचा पुचका; तुझा फटका फुकट गेला रे, आता तुझा नारळ फुटलाच समजा, अशा वाक्यांनी सणाचा उत्साह, पैज जिंकल्याचा आनंद, हशा असा अनुभव उपस्थित नागरिक गर्दी करून घेत असतात.

नारळी पौर्णिमेच्या दिवशीच दहा-दहा नारळाची किंवा त्यापेक्षा अधिक नारळांची पैज रंगते. अलिकडे काही ठिकाणी पैजांचे रुपांतर स्पर्धांमध्येही झालेले आहे. जो दुसऱ्याचे नारळ फोडून स्वत:चे अधिक नारळ शिल्लक ठेवतो तो विजेता ठरतो. यात महिलाही मागे नाहीत. महिला वर्गही नारळ फोडाफोडीचा आनंद घेतात. त्याही दुसऱ्या महिलेचा नारळ फोडून सणाचा आनंद घेतात. शेवटी मोठ्या संख्येने नारळ जमा करून त्याचे विविध पदार्थ बनवून सणाचा आनंद द्विगुणीत केला जातो.

सण आयलाय गो नारळी पुनवेचा

नारळी पौर्णिमेला कोळी समाजात मोठे महत्त्व आहे. त्यांची उपजिविका समुद्रावरच अवलंबून असल्याने समुद्र देवतेला नारळ देऊन शांत राहण्याची आणि आपल्याला मासेमारी करण्यात यश यावे, हा व्यवसाय सुरळीत, निर्विघ्न व्हावा अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी समुद्र देवतेला नारळ अर्पण करून कोळी समाज मासेमारीला सुरुवात करतो. त्यामुळे होड्यांचीही पूजा केली जाते. त्याकरिता होड्यांना रंगरंगोटी, डागडुजी आणि सजावट करतात.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव सकाळी घरातील पूजा केली जाते. त्यानंतर घराघरांत रक्षाबंधनाचा कार्यक्रम चालतो. नाक्यानाक्यावर नारळ फोडाफोडीच्या पैजा रंगतात. सायंकाळी कोळी समाज बांधव पारंपरिक वेश परिधान करून मिरवणूकीसह वाजतगाजत समुद्र देवतेला नारळ अर्पण केला जातो. घराघरांत करंजी, नारळी पाक बनवून एकमेकांना दिले जाते. या वेळी संपूर्ण कुटुंब एकत्र आलेले असते. त्यामुळे आनंदाला, उत्साहाला उधाण आलेले असते, अशी माहिती वरळी कोळीवाड्यातील प्रल्हाद वरळीकर यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -