मुंबई : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंधित असल्याचे सांगत मुंबई शहर बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली. मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहेत, असे पुढे ही व्यक्ती म्हणाली. फोन येताच मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्याचा नंबर आणि लोकेशन शोधले. यानंतर संबंधित व्यक्तीला बोरिवलीतून पकडण्यात आले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई तातडीने केली.
धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव सूरज जाधव असे आहे. तो बोरिवलीचा रहिवासी आहे. याआधीही त्याने बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांना केला होता. त्यावेळीही त्याला अटक झाली होती. याआधी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला घरात घुसून ठार करू, त्याची कार बॉम्बस्फोट करुन उडवून देऊ असा धमकीचा संदेश आला होता. काही दिवसांपूर्वी अमूक विमानात बॉम्ब ठेवला आहे, अशा स्वरुपाच्या धमक्या वाढल्या होत्या. आता हा नवा मुंबई बॉम्बस्फोटाने उडवून देऊ असा धमकी देणारा फोन आला.
विनाकारण भीती निर्माण करण्यासाठी तसेच धमकावून संभ्रम निर्माण करण्यासाठी फोन किंवा संदेश पाठवण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यातील पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भीती निर्माण करण्यासाठी तसेच धमकावून संभ्रम निर्माण करण्यासाठी फोन किंवा संदेश पाठवणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई होणार आहे.