सौंदर्य तुझं – प्राची शिरकर
मुंबई : नऊवारी साड्या (Nauvari Saree) ही महाराष्ट्रीय वारसाची भारताला (Maharashtra Culture) मिळालेली एक अभिमानास्पद देणगी आहे. नऊवारी साडी ज्याला ‘काष्टा’ किंवा ‘लुगडे’ साडी म्हणूनही ओळखले जाते, ही एक पारंपरिक महाराष्ट्रीय साडी आहे जी एका अनोख्या पद्धतीने नेसली जाते. इतिहासाची पाने राणी ताराबाई, राणी लक्ष्मीबाई सारख्या पराक्रमी विरांगणांच्या शौर्य गाथांनी भरलेली आहेत; परंतु यांच्यामध्ये एक सामान्य गोष्ट अशी दिसते की, त्यांची वेशभूषा म्हणजेच नऊवारी साडी. नऊवारी साडी (Nauvari Saree) नेसून युद्धाच्या मैदानात फ्री मुवमेंटसाठी मोकळीक होती. ही साडी महाराष्ट्राची शान आहेच. पण त्याला शक्ती, साहस आणि समानतेच्या प्रतीकाच्या रुपात पाहिले जाते. याला अखंड वस्र असेही म्हटले जाते. कारण याच्यासोबत अन्य वस्र परिधान करण्याची गरज भासत नाही. जुन्या काळात नऊवारी साडी ट्राउजरसाठी नेसली जायची. मात्र काळानुसार त्यात बदल होताना दिसून आला. नऊवारीला काष्टी साडी, सकाच्चा आणि लुगडीच्या नावाने ही ओळखले जाऊ लागले. नऊवारी नेसल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य खुलते.
नऊवारी साडी (Nauvari Saree) नेसल्यानंतर महिला छान नटून थटून तयार होतात. कोणताही पारंपरिक उत्सव म्हटल की महिला नऊवार ही हमखासपणे नेसतात. महिलांना नऊवारी साडी नेसायला इतकी आवडते की, काहीजणी सहावारी साडीचीच नऊवारी करून नेसतात. हा ट्रेंड सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. बरं इतकंच नव्हे, तर नऊवारी साडीला इतका मान आहे की, बाजारात आता त्याचे अनके प्रकार आणि डिझाइन्स पाहायला मिळतात. आता नऊवार नेसण्यासाठी नेसवणारीची गरज लागतेच बरं का… पण ही हौस पूर्ण करण्यासाठी देखील रेडिमेड नऊवारी शिवून मिळते अगदी तुम्हाला पाहिजे तशीच. महाराष्ट्रीय महिलांचा पारंपरिक पोशाख म्हणून याची ख्याती आहे. नऊवार, दागिन्यांचा साज, ठसठशीत नथ, कपाळी चंद्रकोर हेच आहे महिलेचं सौंदर्य. नऊवारी ही फक्त एक फॅशन नसून महाराष्ट्राचा एक पारंपरिक वारसा आहे. आजही महाराष्ट्रीय लोक तो जपतात. या अनोख्या ‘काष्टा’चा काय आहे रुबाब? जाणून घेऊया या लेखातून तिचा पारंपरिक इतिहास.
असा आहे इतिहास
महाराष्ट्राची ओळख बनललेल्या नऊवारी साडीचा इतिहास (Nauvari Saree History) फार जुना आहे. सुरुवातीच्या काळात ही साडी धोतीप्रमाणे नेसली जायची. तसेच ती पुरुष आणि महिला सुद्धा नेसायच्या. राजा-महाराजांच्या काळात युद्धाच्या मैदानात जायचे असेल किंवा शस्र कला शिकायची असेल तेव्हा महिलांना आरामदायी कपडे घालण्याची गरज होती. पुरुषांच्या धोतीवरून प्रेरणा घेत नऊवारी साडी नेसण्याची सुरुवात झाली. याची खासियत होती की, ती नेसून सहजपणे अस्र-शस्रचा वापर केला जात होता. साडीचे हे एकमेव रूप आहे, ज्याला मिलिट्री युनिफॉर्म मानले जाते. इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास नऊवारी साडी ही कॉटनची बनवली जायची. मात्र काळानुसार ती फ्रॅबिकमध्ये तयार केली जाऊ लागली. कॉटनसह विविध प्रकारच्या सिल्कपासून ती तयार केली जाऊ लागली. सुती नऊवारी ही दैनंदिन कामे करताना फार उपयोगी यायची, तर पूजा-पाठ आणि अन्य विशेष कार्यक्रमांवेळी सिल्कपासून तयार करण्यात आलेली नऊवारी साडी नेसली जाते. यामध्ये लहान-लहान बुट्टी आणि सोनेरी रंगाच्या जरीची विशेष बॉर्डर केलेली दिसते.
नऊवारीचे ऐतिहासिक महत्त्व
‘नौवारी’ हा शब्द मराठी शब्द ‘नौ’ पासून आला आहे, ज्याचा अर्थ नऊ आहे, जो साडीच्या नऊ यार्ड लांबीचा संदर्भ देतो. या साडीचा उगम महाराष्ट्रातील मराठा योध्यांपासून होतो. त्या काळातील महिला युद्धादरम्यान आणि दैनंदिन कामांमध्ये हालचाल करण्यास मदत करण्यासाठी धोतरसारखी ही शैली वापरत असत. नौवारी साडी ही केवळ कपड्यांचा तुकडा नाही, तर महाराष्ट्रीय महिलांच्या ताकदीचे आणि लवचिकतेचे प्रतीक आहे.
सांस्कृतिक महत्त्व
महाराष्ट्रात, नऊवारी साडी ही केवळ पोशाखापेक्षा जास्त आहे; ती एक सांस्कृतिक ओळख आहे. विवाहसोहळा, धार्मिक समारंभ आणि गणेश चतुर्थी आणि गुढी पाडवा यासारख्या महत्त्वाच्या जीवनातील कार्यक्रमांमध्ये महिला अभिमानाने ती परिधान करतात. साडी ही राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करते, जी पिढ्यानपिढ्या एक प्रिय वारसा म्हणून पुढे नेली जाते.
कारागीर
नऊवारी सिल्क साडी बनवण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता असते ज्यांना विणकामाची गुंतागुंतीची कला समजते. या साड्या बहुतेकदा शुद्ध रेशमापासून बनवल्या जातात. ज्यामध्ये निसर्ग, धार्मिक चिन्हे आणि महाराष्ट्रीय संस्कृतीने प्रेरित असलेल्या विस्तृत आकृतिबंध असतात. प्रामुख्याने पैठण आणि येवला भागातील कारागीर प्रत्येक विणकामात आपले मन आणि आत्मा ओततात. प्रत्येक साडी महाराष्ट्राच्या कापड वारशाची प्रामाणिकता आणि भव्यता प्रतिबिंबित करते याची खात्री करतात.
नऊवारी कापड आणि डिझाइन
नऊवारी साड्या पारंपरिकपणे शुद्ध रेशमापासून बनवल्या जातात, ज्या त्यांच्या समृद्ध पोत आणि टिकाऊपणासाठी ओळखल्या जातात. साड्यांमध्ये बहुतेकदा हिरवा, लाल, पिवळा आणि जांभळा असे दोलायमान रंग असतात, जे समृद्धी, आनंद आणि अध्यात्माचे प्रतीक आहेत. बॉर्डर्स आणि पल्लू सामान्यतः जरीकामाने सजवलेले असतात, जे साडीच्या शाही स्वरूपाला जोडतात. नऊवारी साड्यांमध्ये वापरलेले धागे उच्च दर्जाचे असतात, ज्यामुळे साडीची वर्षानुवर्षे चमक आणि मऊपणा टिकून राहतो.
नऊवारीचे प्रकार
पूर्वीच्या काळात ब्राह्मणी नऊवारी साड्या मुख्य प्रसंगी नेसल्या जायच्या. ही नऊवारी साडी नेसायची (Nauvari Saree Types) एक विशिष्ट पद्धत आहे. या नऊवारी साडीचा काठाकडचा भाग, वर कमरेला खोचायचा असतो. ज्याला ओचा असे म्हटले जाते. यामध्ये निऱ्यांचा घोळ सुद्धा जास्त असतो. या साडीमध्ये निऱ्या कमरेला न खोचता त्या एकत्र घेऊन त्याचे ‘केळं’ काढले जाते. ही साडी साधारणतः पायापर्यंत झाकलेली असली तरी, पोटऱ्यांचा काही भाग उघडा राहतो. नऊवारी साडी नेसण्याच्या पाच सर्वाधिक लोकप्रिय पद्धती आहेत. त्यामध्ये ब्राम्हणी स्टाइल, पारंपरिक मराठी साडी, कोल्हापुरी नऊवारी, पेशवाई साडी, कोळी आणि शेतकऱ्यांची साडी आणि कंटेम्प्ररी मराठी साडी. पण मूळ स्टाइल ही काष्टी. यामध्ये साडीची बॉर्डर मागच्या बाजूला खोचली जाते. काष्टी साडी ही खरंतर कॉटनची बनवण्यात आलेली असते.