सौंदर्य तुझं – प्राची शिरकर
पारंपरिक भारतीय साडी म्हणून बनारसी साडी (Banarasi Saree) हा उत्तम पर्याय आहे. साडी हे भारतीय महिलांचे महावस्त्र म्हणून ओळखले जाते. या वेषभूषेमध्ये स्त्रीचे सौंदर्य अधिकच खुलून येते. साडीमध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की, साड्यांचे सर्वच प्रकार तिच्याकडे असायला पाहिजेत. मात्र कधी कधी काही कारणास्तव महिलांना असे करणे शक्य नसते. त्यातही जे अतिशय लोकप्रिय, प्रसिद्ध आणि आकर्षक प्रकार आहे ते घेण्यास प्रत्येक स्त्री आग्रही असते. यातलाच एक अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार म्हणजे बनारसी साडी. (Banarasi Saree)
बनारसी साडीचा (Banarasi Saree) थाट आहेच भारी… खरंच लग्नसोहळ्यात प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचा स्वागत समारंभाचा लूक अगदी शाही असला पाहिजे. बहुतेक मुलींचा कल लाल रंगाची शाही बनारसी याकडे जास्त असतो. कोणत्याही खास आणि शुभ दिवशी बनारसी साडी नेसणं महिलांना नक्कीच आवडतं. अतिशय सुंदर, रेखीव अशी बनारसी साडी महिला वर्गामध्ये कमालीची प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की, शुद्ध बनारसी सिल्क साडी ही भारतीय हस्तकलेचे एक मौल्यवान रत्न आहे. तिच्या सौंदर्य आणि नाजूकपणामुळे ही साडी सर्व जगभर ओळखली जाते. त्यामुळे बनारसी साड्यांना मागणीही मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळेच बाजारपेठाही बनारसी साड्यांनी फुलून गेलेल्या दिसतात. चला तर मग जाणून घेऊया या सदरातून… बनारसीचा शाही इतिहास काय आहे अस्सल बनारसी साडीची वीण, तिच्या धाग्यांची रचना आणि तिचे मनमोहक नक्षीकाम.
बनारसीचा शाही इतिहास
बनारसी साडी (Banarasi Saree History)ही भारतामधील उत्तर प्रदेश राज्यामधील वाराणसी या शहरामध्ये बनवली जाते. या साडीला बनारसी साडी किंवा वाराणसी साडी असेही म्हणतात, त्याचबरोबर या साडीचा इतिहास खूप प्राचीन आहे. वाराणसी हे अति प्राचीन शहर आहे, हे शहर बनारसी साडी बरोबरच तेथील मंदिरांसाठीही अतिशय प्रसिद्ध आहे. कापूस वस्त्र उद्योगाचे एक भरभराटीचे क्षेत्र म्हणून शफल फीच यांनी बनारसचा उल्लेख केला आहे. चौदाव्या शतकाच्या आसपास मुघल काळात ही कला विकसित झाली. या साडीवरती मुघल प्रेरित रचनांचा वापर केला गेला आहे. उदाहरणार्थ गुंफलेल्या फुलांचे आणि पानांचे नक्षीकाम, कलगा आणि वेल. बाहेरच्या बाजूला झालर नावाची सरळ पानांची एक तारी या पद्धतीने या साडीवरील विणकाम असते. गुजरातमधील १६०३ दुष्काळामध्ये तेथील रेशीम विणकर बनारसमध्ये स्थलांतरीत झाले. त्यानंतर १७ व्या शतकात रेशीम ब्रॉकेड विणकाम सुरू झाले. १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये उत्कृष्टपणे या साडीचे विणकाम विकसित झाले. वाराणसी हे शहर गुलाबी मिनाकरीसाठी देखील ओळखले जाते. त्याचबरोबर हे स्थान भारतातील सर्वात मौल्यवान हातमागावरती बनवलेल्या साडीसाठी प्रसिद्ध आहे. या साड्या हातमागावरती बनवल्या जातात. कारागीर स्वतःच्या हाताने या साड्यांवरती अतिशय सुंदर असे रेशीम आणि जरीचे विणकाम करतात. १०० वर्षांहून अधिक काळ बनारसी साड्या बनवण्याच्या व्यवसायात असलेले जेडीएस बनारस सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर दिसणाऱ्या बनारसी सिल्क साड्या देते.
बनारसी डिझाइन
बनारसी साड्या (Banarasi Design) त्यांच्या मजबूत बनवट, नाजूक कारागिरी आणि तपशीलवार डिझाइन्ससाठी प्रसिद्ध आहेत. काळानुसार कठोर परिश्रम आणि बारकाईने काम करणाऱ्या कारागिरांनी त्यांना आणखी खास बनवले आहे. बनारसी साड्यांमध्ये कतान (शुद्ध रेशीम), कोरा (ऑर्गेंझा), काधवा (डिझाइन केलेली कढाई) असे प्रकार येतात. यामध्ये मीना (रंग भरलेले) आणि जरीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, ज्यामुळे त्यांचे सौंदर्य आणखी वाढते. साड्यांचे वजनही त्यांच्या कापड आणि कढाईच्या खोलीवर अवलंबून असते.
बनारसी साडीचे वैशिष्ट्य
बनारसी सिल्क साड्या सोने-चांदीच्या, ब्रोकेड किंवा जरी, उत्कृष्ट प्रकारचे रेशीम आणि त्यावरील केलेल्या भरत कामासाठी विशेष प्रसिद्ध आहे. या साड्या अस्सल रेशमापासून बनवल्या जातात आणि त्यावरील जरीच्या विणकामामुळे या साड्या अतिशय महाग असतात. बनारसमधील विणकर या साड्या बनवण्यासाठी पारंपरिक यंत्रांचा वापर करतात. ही साडी हातमागावरती बनवण्यासाठी १५ दिवस ते १ महिना लागतो. जर साडीवरील नक्षीकाम, कलाकुसर अधिक असेल तर त्याप्रमाणे साडी बनवण्यासाठी अधिक वेळ लागतो. काही साड्या बनविण्यासाठी ६ महिने ते १ वर्ष इतका कालावधी देखील लागतो. या साडीवरील इतर वैशिष्ट्य म्हणजेच त्यावरील सोन्याचे काम, कॉम्पॅक्ट विणकाम, लहान तपशिलांसह आकृत्या, धातूचे दृश्य प्रभाव, जल आणि मीना वर्क. अस्सल बनारसी सिल्क. साडीची किंमत किमान १०-१२ हजार रुपये असते.
बनारसी साडी कशी ओळखावी ?
धाग्याचा नमुना : अस्सल बनारसी साड्यांची वीण ही नेहमी आडव्या दिशेने केली जाते. त्यामुळे साडी शुद्ध बनारसी सिल्कची असेल तर तिच्या धाग्यांची रचना नेहमीच आडवी असते. उभ्या दिशेने कुठेही धागे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. शुद्ध बनारसी रेशमी साड्या सर्व हाताने विणलेल्या असतात आणि त्यात अविश्वसनीय हस्तकला असते, ज्यासाठी अनेकदा आठवडे, कधीकधी महिनेही लागतात. साडी उलटा आणि मागचा देखावा तपासा; अस्सल बनारसीमध्ये तरंगणारे धागे असतात जे हाताने विणलेल्या विणकामासाठी एक प्रमुख साधन आहेत. मशीनने बनवलेल्या साड्यांचा मागचा भाग कमीत कमी धाग्याच्या कामासह गुळगुळीत असतो.
बनारसी GI टॅग : साडी शुद्ध बनारसी सिल्कपासून बनलेली आहे की नाही हे ठरवण्यासाठी ट्रेडमार्क तपासणे ही पहिली पायरी आहे. बनारसी सिल्क साड्यांचा स्थलाकृतिक चिन्ह (GI) टॅग हा प्रशासनाने पुष्टी केलेले चिन्ह आहे जे वस्तूचा प्रारंभ बिंदू आणि गुणवत्ता प्रमाणित करतात. GI टॅग हे एक असे चिन्ह आहे ज्यावर एक अद्वितीय क्रमांक असतो आणि तो साडीच्या काठावर शिवलेला असतो. खरेदी करण्यापूर्वी टॅग नक्की पाहा.
साडीच्या काठावरच्या खुणा : बनारसी सिल्क साडी विणताना तिच्या कडा घट्ट ठेवण्यासाठी खिळ्यांनी चिटकवल्या जातात. यामुळे त्याची डिझाईन खराब होत नाही आणि थ्रेड्सही घट्ट ठेवल्या जातात. त्यामुळे बनारसी सिल्क साडी खरेदी करण्यापूर्वी साडीच्या काठावर असलेल्या पिनचे चिन्ह पाहा.
बनारसी साडीची चमक : बनारसी सिल्क साड्या खऱ्या रेशमापासून बनवल्या जातात, ज्याची चमक कृत्रिम धाग्यांपेक्षा खूप वेगळी असते आणि स्पर्शाला खूप मऊ असते. रेशमाच्या धाग्यांनी विणलेली असल्यामुळे बनारसी साडी अत्यंत चमकदार आणि रॉयल दिसते. या साडीचे रंग आणि डिझाईन दोन्ही डोळ्यांत टिपतात आणि सुंदर दिसतात. बनारसी साड्यांमध्ये लाल, हिरवा आणि सोनेरी रंग हे लोकप्रिय पर्याय आहेत.
साडीचे वजन तपासा : शुद्ध बनारसी रेशमी साड्या थोड्या जड असतात कारण त्यात भरपूर रेशमी धागे असतात आणि खऱ्या जरीचे काम असते. जर साडी खूप हलकी वाटत असेल पण तिच्यावर गुंतागुंतीचे जरीचे काम असल्याचा दावा केला असेल, तर ती निश्चितच खरी नाही.