मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी चार प्रकरणांमध्ये मिळून एकूण १०.९२३ किलो वजनाचं सोनं पकडलं. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८.४७ कोटी रुपये आहे. या चार प्रकरणांमध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी ३ जण विमानतळावरील खासगी कंपनीचे कर्मचारी आहेत.
पहिल्या प्रकरणात कस्टम अधिकाऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या विमानतळावरील कर्मचाऱ्याला संशयावरून अटक केली. या कर्मचाऱ्याच्या पँटच्या खिशात मेणाच्या वड्यांमध्ये लपवलेल्या सोन्याच्या सहा अंडाकृती आकाराच्या कॅप्सूल आढळल्या. या सोन्याची किंमत २.२७ कोटी रुपये आहे. दुसऱ्या प्रकरणातही कस्टम अधिकाऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक केली. त्याने अंतर्वस्त्रात मेणाच्या वड्यांमध्ये लपवलेल्या सोन्याच्या अंडाकृती आकाराच्या सात कॅप्सूल आढळल्या. या सोन्याची किंमत २.३६ कोटी रुपये आहे. तिसऱ्या प्रकरणामध्येही कस्टम अधिकाऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक केली. त्याने अंतर्वस्त्रात मेणाच्या वड्यांमध्ये लपवलेले १.३१ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. सोन्याच्या तस्करीच्या आरोपात कस्टमने तिन्ही खासगी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. चौथ्या प्रकरणात विमानतळावरील कचऱ्याच्या काळ्या पिशव्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या काळ्या पिशव्यांमध्ये प्रत्येकी एक या पद्धतीने काळ्या रंगाच्याच पाउचमध्ये लपवलेले सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत २.५३ कोटी रुपये आहे. यानंतर आणखी दोन जणांना अटक करण्यात आली. कस्टम विभागाने सोन्याच्या तस्करीच्या चार प्रकरणांमध्ये एकूण पाच जणांना अटक केली आहे.