नवी दिल्ली : ज्याची भीती होती, तेच घडले. आयपीएल २०२५च्या आधी, ५ वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल वाईट बातमी आली आहे. जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे बरा झालेला नसल्यामुळे तो आयपीएलच्या १८ व्या हंगामात एमआयच्या पहिल्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा झटका आहे. बुमराहला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. तो एप्रिलच्या सुरुवातीला संघात सामील होऊ शकतो. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान बुमराहला दुखापत झाली होती. ५ सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली, त्यानंतर तो संपूर्ण सामन्यात गोलंदाजी करू शकला नव्हता. या दुखापतीमुळे बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आणि चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडावे लागले. आता तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडल्याचे वृत्त समोर आले आहे.
MI vs DC WPL 2025 : दिल्ली विरुद्ध मुंबई महाअंतिम सामना आज रंगणार
४ जानेवारी रोजी सिडनी येथे झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहला पाठीची दुखापत झाली होती. तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. मार्च २०२३ मध्ये शस्त्रक्रियेनंतर पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह मैदानाबाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.बुमराह एप्रिलच्या सुरुवातीला संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, तो मार्च महिन्यात खेळल्या जाणाऱ्या एमआयच्या ३ सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. बुमराह किती सामने मुकेल आणि त्याचे कधी पुनरागमन होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आयपीएलनंतर जूनमध्ये टीम इंडियाला कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करायचा असल्याने बीसीसीआय या स्टार गोलंदाजाच्या तंदुरुस्तीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
अशा परिस्थितीत, बीसीसीआयचे संघ व्यवस्थापन आणि वैद्यकीय पथक बुमराहबाबत कोणतेही घाईघाईने पाऊल उचलू इच्छित नाही. मुंबई इंडियन्स आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)च्या वैद्यकीय पथकाच्या मंजुरीची वाट पाहत आहे. कारण एनसीए प्रथम बुमराहला तंदुरुस्त घोषित करेल. त्यानंतरच या स्टार गोलंदाजाचा मुंबई संघात सामील होण्याचा मार्ग मोकळा होईल.