मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात २७ सप्टेंबरपासून कानपूर कसोटी सामना खेळवण्यात आला. यात भारताचे फलंदाज आणि गोलंदाज यांनी जबरदस्त फॉर्म दाखवला.
भारताने या सामन्यात बांगलादेशला ७ विकेटनी हरवत मालिका २-० अशी जिंकली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने २८० धावांनी जिंकला होता. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय बनला होता. रोहित मालिकेत एकूण ५० धावाही करू शकला नाही.
तर विराट कोहलीला संपूर्ण मालिकेत १०० धावाही करता आल्या नाहीत. अशातच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मालिकेच्या आधी दोघांचा फॉर्म भारतासाठी धोक्याची घंटाच आहे.
रोहितने बांगलादेशविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या ४ डावांमध्ये एकूण ४२ धावा केल्या. त्याची सरासरी खूप खराब म्हणजेच १०.५० इतकी होती. रोहितची सर्वोत्तम धावसंख्या २३ इतकी होती.
दुसरीकडे विराट कोहली आहे ज्याने ४ डावांत मिळून ९९ धावा केल्या. कोहलीची या मालिकेतील सरासरी ३३ इतकी होती. मालिकेच्या टॉप ३ स्कोररमध्ये भारतीय फलंदाज राहिले. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत यशस्वी जायसवालने १८९, शुभमन गिलने १६४ आणि ऋषभ पंतने १६१ धावा केल्या.