अमरावती : संत्रा फळांची तत्काळ ग्रेडींग आणि प्रतिकिलो या दराने खरेदी करुन नगदी चुकारा देण्याचा नवा प्रकल्प अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केला आहे. त्यामुळे यापुढे संत्रा उत्पादकांना केव्हाही संत्रा विक्री करता येणार असून त्यानुसार रक्कम मिळवता येणार आहे.
अचलपुर, चांदुरबाजारसह अंजनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हवा तेवढा लाभ या फळबागांपासून होत नसल्याने त्यांचे सतत आर्थिक नुकसान होत आहे. संत्रा खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून होणारा त्रास, करार करुनही वेळेवर सौदा रद्द करणे, बागेतील संत्रा नेल्यानंतर पैशासाठी त्रास देणे, अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.हा त्रास पाहता अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती यांच्यासह सर्व संचालकांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजार समितीच्या टिएमसी यार्डवर हैद्राबाद येथील चिफो ॲग्रोटेक कंपनी लि. या कंपनीशी करार करत नवा प्रकल्प उभा केला. यामुळे छोट्या-मोठ्या संत्रा बागायतदारांचा संत्रा ग्रेडींग करत खरेदी केली जाणार आहे. शिवाय त्यांना तत्काळ नगदी चुकारासुध्दा दिल्या जाणार आहे.
अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादनाचे क्षेत्र पाहता संत्रा खरेदीची स्थायी यंत्रणा निर्माण व्हावी व संत्रा फळांना योग्य भाव मिळावा यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. शेतकऱ्यांकडून आलेल्या फळाची ग्रेडींग करत खुल्या लिलाव पध्दतीने व्यापाऱ्यांनी दर निश्चीत केल्यानंतर किलो प्रमाणे भाव दिल्या जाणार आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे. बाजार समितीने या कंपनीला जागा उपलब्ध करुन दिली असुन कंपनीने त्या ठिकाणी ग्रेडींगची यंत्रणा बसविली आहे, असे समिती प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान संत्रा आणण्यासाठी कंपनीच्या वतीने कॅरेटची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. या सुविधेमुळे अल्प क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.