५ सप्टेंबर रोजी म्हणजेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदिनी साजरा होणारा शिक्षक दिन अनेकार्थाने महत्त्वाचा. शिक्षणाचा सध्याचा स्तर आणि स्थिती पाहता शिक्षक दीन झाल्याचे सर्रास जाणवते. यासाठी चार-सहा महिन्यांमध्ये येऊ घातलेले नवीन शिक्षण धोरण प्रत्यक्षात आल्यानंतर पुढचा काळ विचारात घेतला तर शिक्षकांना बदलावे लागेल, हे लक्षात घ्यायला हवे. नवीन धोरण, उद्दिष्ट्ये, शिकवण्याची पद्धतही बदलावी लागेल. नवी भूमिका नीट पार पाडायची असेल तर शिक्षकांना नव्या शिक्षण पद्धतीनुसार प्रशिक्षण द्यावे लागेल. हे साधले तर शिक्षक दीन झालेले नव्हे तर अधिक कार्यक्षम होऊन शिक्षक दिन साजरा करताना आपण पाहू शकतो, याची खात्री वाटते.
विशेष – रमेश पानसे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
शिक्षक दिन साजरा करताना शिक्षकांची दीन अवस्था डोळसपणे लक्षात घेण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. काही महिन्यांमध्ये नवीन शिक्षण धोरण येऊ घातले आहे. नवी धोरणे देणाऱ्या ‘कस्तुरीरंगन समिती’ने केलेल्या पूर्वाभ्यासात या क्षेत्रातील उणिवा समोर आल्याचे स्पष्ट केले आहे. स्वाभाविकच नव्या धोरणांद्वारे शिक्षकांना त्या दूर करण्याची संधी मिळणार आहे. शिक्षकांनी याचा लाभ घ्यायला हवा. विद्यार्थ्यांना तो आपसूकच मिळेल.
५ सप्टेंबर रोजी म्हणजेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदिनी साजरा होणारा शिक्षक दिन अनेकार्थाने महत्त्वाचा. खेरीज थोर शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांचीही जयंती याच दिवशी असते. युनेस्कोकडून गेल्या हजार वर्षांमधील जगातील शंभर श्रेष्ठ शिक्षण तज्ज्ञांमध्ये त्यांचा नामोल्लेख केला आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील फार कमी लोकांना त्यांच्या मोठेपणाची कल्पना आहे. म्हणूनच त्यांचे स्मरण करत हा दिवस साजरा करायला हरकत नाही. शिक्षणाचा सध्याचा स्तर आणि स्थिती पाहता शिक्षक दीन झाल्याचे सर्रास जाणवते. शिक्षकाची दीनता कमी करण्यास प्राधान्य देत यंदा आपण हा दिवस साजरा केला तरच तो खऱ्या अर्थाने शिक्षक दिन ठरेल. अलीकडच्या घटनांचा मागोवा घेता, बदलती समाजधारणा लक्षात घेता शिक्षकांवरील जबाबदारी वाढते आहे का, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मात्र हा आजचा नव्हे तर कायमच समोर येणारा प्रश्न आहे. इथे आपण लक्षात घ्यायला हवे की, शिक्षण जीवनाशी जोडलेले आहे. मुले आपले पुढचे आयुष्य घडवण्यासाठी शिकायला येतात. म्हणजेच पुढल्या आयुष्याची तयारी करून देणे, ही शिक्षकांची जबाबदारीच असते. या जबाबदारीतील विविध मुद्दे क्षणभर बाजूला ठेवले तरी समजते की, जीवन बदलते तशी जीवनशैली बदलते. माणसांच्या गरजा बदलतात. तंत्रज्ञान, शास्त्र-ज्ञान बदलते. नवनवीन संशोधन होते आणि या सगळ्यांत शिक्षण ढवळून निघते. म्हणजेच शिक्षणाला नवीन रूप देण्याचा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवावा लागतो. जीवन बदलते असेल तर शिक्षणही सातत्याने बदल अपरिहार्य ठरते. सर्वप्रथम हे सत्य आपण स्वीकारायला हवे. आता शिक्षकांच्या भूमिकेविषयी काही भाष्य करण्याऐवजी नवे शिक्षण धोरण काय सांगते ते पाहू.
हे धोरण निश्चित करण्यापूर्वी, त्यावर काम सुरू करण्यापूर्वी कस्तुरीरंगन कमिटीने एक आढावा घेतला होता. या पाहणीचा संदर्भ देत त्यांनी अनेक समस्या दिसून आल्याचे म्हटले आहे. या समस्यांचा विचार करूनच त्यांनी नवीन धोरणांची दिशा ठरवली. समितीला शिक्षकांसंबंधी ठळकपणे जाणवलेल्या दोन गोष्टी होत्या. त्यातील एक म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणात रस न वाटणे ही होती. म्हणजेच इथे शिकायला येणारेच आनंदाने, उत्साहाने शिकू इच्छित नसल्याचे पाहणी करणाऱ्यांना आढळले आणि हे वास्तव असताना पुढच्या गोष्टी किती कठीण होतात, हे त्यांनी आग्रहाने नमूद केले. या महत्त्वाच्या मुद्द्यांसंबंधी कारणे देताना त्यांनी शाळेत आवश्यक दर्जाच्या सुविधा नसण्याच्या दुसऱ्या त्रुटींकडेही
लक्ष वेधले.
आपल्या देशात सरकारी शाळा अधिक आहेत, मात्र शिक्षण हा कोणत्याही सरकारचा प्राधान्यक्रम राहिल्याचे दिसत नाही. अलीकडे तर पैसे गुंतवण्याऐवजी पैसे वाटण्यावरच सरकार भर देताना दिसते. खरे पाहता कोणत्याही सरकारला पैसे वाटण्याची मुभा नसते. पैसे वाटून कोणत्याही क्षेत्राची प्रगती होत नसते, तर त्यासाठी पैसे गुंतवावे लागतात. मात्र सध्या आपण या गुंतवणुकीपासून दूर जात आहोत. केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारे जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च करत असतील, तर तो अनुत्पादक खर्चाचा विषय ठरतो. म्हणजेच शिक्षणाकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे साध्या-साध्या सुविधादेखील मिळत नाहीत. शिक्षकदिनी या महत्त्वपूर्ण बाबींची नोंद घ्यायला हवी.
याच समितीला अभ्यासात आढळलेला आणखी एक मुद्दा शिक्षकांसंदर्भातील आहे. तो असा की, पाहणीमध्ये शिक्षकांची विलक्षण उदासीनता दिसली. त्यामुळेच आता त्यामागील कारणे शोधावी लागतील, त्यासंबंधीच्या पैलूंवरही विचार करावा लागेल. हे सगळे आहेच, कारण समितीला आढळून आल्याप्रमाणे शिक्षकच शिकवण्यास उदासीन असेल तर विद्यार्थ्यांचे कधीच भले करू शकणार नाही. शिक्षक उत्साही असेल तरच मुलांच्या जीवनाला आणि शिक्षणाला आकार देऊ शकेल. आज बरेच शिक्षक नवीन काही शिकायला तयार नाहीत. नवीन वाचायला, प्रयोग करायला तयार नाहीत. कोणी याला दहा अपवाद सांगू शकेल. पण सर्वसामान्यत: समोर येणारे चित्र असेच आहे, यात शंका नाही. अशी स्थिती असताना मुलांना शिक्षणात रस कसा निर्माण होईल, शिक्षक तो कसा निर्माण करू शकेल, हा प्रश्न उरतो. मुलांना शिक्षणात रस ना वाटण्याचा दोष शिक्षकांनाच देता येतो.
अगदी कमी शिकलेल्या मुली अंगणवाडीत लहानग्या मुलांना रमवताना दिसतात. हे एकच उदाहरण पुरेसे बोलके आहे. मात्र अनुत्साही शिक्षक याचा विचार करत नाहीत. नव्या शिक्षण धोरण समितीने सांगितलेली आणखी एक बाब शिक्षकांना पुरेसे प्रशिक्षण न देण्याची आहे. वरकरणी सरकारकडून प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनाच याची खोलवर जाण नसते. त्यामुळेच वरवरचे प्रशिक्षण देऊन विषय संपवला जातो. कितीजणांना प्रशिक्षित केले, हे आकडे टाकून एक रकाना भरला जातो. प्रत्यक्षात मात्र या प्रशिक्षणात आपल्याला काहीच मिळाले नसल्याचे शिक्षक सांगतात.
प्रशिक्षणाची प्रक्रियाच इतकी सदोष असेल, तर शिक्षणविश्वाची स्थिती कशी सुधारणार, हा प्रश्नही विचारात घ्यायला हवा. इथे लक्षात घेण्याजोगी सर्वात महत्त्वाची बाब प्रशिक्षण काळानुसार बदलावे लागते, हे समजून घेण्याची आहे. पाच वर्षांपूर्वी प्रशिक्षण दिले असेल, तर दरम्यानच्या काळातील शास्त्र-संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षणपद्धती, शिक्षणाची उद्दिष्ट्ये अशा वेगवेगळ्या आयामांमध्ये झालेल्या बदलांचा विचार केलाच पाहिजे. तो करून गरजेनुसार प्रशिक्षण दिले तरच अपेक्षित परिणाम बघायला मिळतील. पण कस्तुरीरंगन समिती म्हणते की, शिक्षकांनी कालानुरूप, गरजेनुसार प्रशिक्षण न घेतल्यामुळे अध्यापनाच्या आणि अध्ययनाच्या पद्धती अयोग्य ठरत आहेत. त्यांनी निदर्शनाला आणलेली ही बाब अत्यंत महत्त्वाची वाटते. कारण शेवटी हे तज्ज्ञांच्या समितीचे विधान आहे. त्यामुळे गांभीर्य ओळखायला हवे.
मात्र आपल्याकडे एकंदरच तज्ज्ञांना किंमत द्यायची नसते! राजकारणाचा, शासनाचा असा नियम असल्यासारखीच स्थिती आहे. कारण शासनातील अगदी खालपासून वरपर्यंत कोणालाच आपल्यापेक्षा जास्त काही येत असणारा माणूस जवळचा वाटत नाही. कधी तरी कोणी तरी हे स्पष्ट बोलायला पाहिजे आणि लोकांनीही हे गांभीर्याने ऐकायला, समजून घ्यायला पाहिजे. शिक्षणक्षेत्राची अवस्था सुधारायची तर नव्या शिक्षण धोरणांमध्ये शिक्षकांविषयी सांगितलेल्या सुधारणांचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे. हा प्रयोग तीन पातळ्यांवर होऊ शकतो. पहिला विचार शिक्षकाने वर्गाच्या पातळीवर केला पाहिजे. दुसरी पातळी शाळेची आहे. वर्गातील शिक्षणाव्यतिरिक्त मुलांमध्ये आवड निर्माण करणाऱ्या, त्यांच्या जीवनाला अर्थ देणाऱ्या अनेक गोष्टी शाळेमध्ये करता येतात. सहली, कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा आदी अंगांनी त्यांच्यामध्ये आवड निर्माण करण्याचा मुद्दा या पातळीवर हाती घेता येईल. तिसरी पातळी अर्थातच शासनस्तरावरील आहे.
वस्तुत: बालवाडीमध्ये शिकवणारी शिक्षिका आपल्या विषयात एम. ए.च्या पातळीवर शिकवणाऱ्या शिक्षिकेइतकी कुशल असायला हवी. मग तिला प्राध्यापकाचे वेतनही देण्यासही हरकत असण्याचे कारण नाही. मी हे टोकाचे बोलत आहे, असे एखाद्याला वाटू शकेल. पण यामागची भूमिका अशी की, शिक्षण वेगाने घडण्याचे हेच ते (बालवाडीतल्या मुलांचे) वय असते. म्हणूनच ते उत्तम झाले तर पुढच्या शिक्षणावर चांगला प्रभाव राहील. म्हणजेच बालवाडीमध्ये उत्तम शिक्षण मिळाले तर प्राथमिक शिक्षणातील अडचणी कमी होतात आणि प्राथमिक शिक्षण चांगले झाले तर माध्यमिक शिक्षणातल्या अडचणी कमी होतात. अशा तऱ्हेने मुले पुढे जाऊ शकतात. म्हणून वर्ग, शाळेपासून थेट धोरणे ठरवणाऱ्यांच्या पातळीपर्यंत सगळ्यांनीच याचा विचार करायला हवा. दुर्दैवाने आपल्याकडे शिक्षण ही अत्यंत दुर्लक्षित बाब राहिली आहे. हे सिद्ध करण्यासाठी फार कष्ट घेण्याची गरज नाही. मंत्रिमंडळ स्थापन होते तेव्हा शिक्षणखाते नको, अशी प्रत्येकाची मागणी असते. मला शिक्षण खाते द्या; मी त्यात आमूलाग्र बदल घडवून दाखवतो, असे कोणी म्हटल्याचे ऐकिवात नाही. याचे कारण या क्षेत्रातील कोणाला काही कळतही नाही आणि या क्षेत्रात वरच्या वर पैसा खाता येत नाही. मात्र आता ही परिस्थिती बदलायला हवी.
चार-सहा महिन्यांमध्ये येऊ घातलेले नवीन शिक्षण धोरण प्रत्यक्षात आल्यानंतर पुढचा काळ विचारात घेतला तर शिक्षकांना बदलावे लागेल, हे लक्षात घ्यायला हवे. नवीन धोरण, त्यामागील उद्दिष्ट्ये समजून घेऊन नव्या पद्धतीने काम करावे लागेल. शिकवण्याची पद्धतही बदलावी लागेल. नवी भूमिका नीट पार पाडायची असेल तर शिक्षकांना नव्या शिक्षणपद्धतीनुसार प्रशिक्षण द्यावे लागेल. हे साधले तर शिक्षक दीन झालेले नव्हे तर अधिक कार्यक्षम होऊन शिक्षक दिन साजरा करताना आपण पाहू शकतो, याची खात्री वाटते.
(शब्दांकन : स्वाती पेशवे)