Saturday, March 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजश्वास नावाची जादुई अनुभूती

श्वास नावाची जादुई अनुभूती

प्रासंगिक – राजशेखर हिरेमठ

रोजच्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगांमधून निर्माण होणाऱ्या भावभावनांचे आपल्या मनावर सतत बरे-वाईट आघात होत असतात. काही वरवरचे असतात तर काही मर्मावर बोट ठेवणारे. संस्कारांचा हा साठा दिवसागणिक वाढत जातो. किंबहुना, आपल्याला अशी काही विद्या वा तंत्र माहीतच नसते जी मन हलके करेल आणि इथेच आपला श्वास आणि
त्यामुळे येणारी तरलता प्रभावीपणे आणि सहजगत्या कामास येते.

माणूस हा एक मनस्वी प्राणी. बुद्धी, स्मृती, विचार, भावना यांचे एक संमिश्र रसायन. प्रत्येकजण वेगळा आणि तरीही जोडला गेलेला. मनस्वी आहे म्हणून, प्रत्येकाचे आकलन वेगळे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि म्हणून जगाकडे आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा. प्रत्येकजण स्वतःशी सतत संवादात असतो. दोन घटका स्वत:साठी वेळ मिळतो तेव्हा तो अंतर्मुख होतोच होतो. आपल्या रोजच्या जीवनात अनेक प्रसंग घडत असतात. हा संस्कारांचा साठा दिवसागणिक वाढतच जातो. क्वचितच आपल्याला आपले हे संस्कार पूर्णपणे काढून टाकता येतात. किंबहुना, आपल्याला अशी काही विद्या वा तंत्र माहीतच नसते जी मन हलके करेल आणि इथेच आपला श्वास आणि त्यामुळे येणारी तरलता प्रभावीपणे आणि सहजगत्या कामास येते.

श्वास म्हटले की, लगेच प्राणायाम (प्राणाचा आयाम म्हणजेच श्वासाचा व्यायाम) आठवतो. प्राणायामामध्ये प्रयत्नपूर्वक श्वास घेतला जातो. प्राणायाम हे एक स्वतंत्र शास्त्र आहे आणि त्याचे अनेक फायदेही आहेत. पण श्वासाबद्दल काही विपरीतही सांगता येते. आपली श्वसन प्रक्रिया सतत सुरू असते. तीही आपल्या नकळत. पण तिच्याकडे आपण जाणीपूर्वक, तटस्थपणे पाहणे म्हणजे श्वास जसा आहे तसा पाहणे, बघणे, जाणणे. प्राणायामापेक्षा ही एक खूप वेगळी आणि भन्नाट गोष्ट आहे. त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली, जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि यश मिळाले तर अलिबाबाच्या गुहेची चावीच हाती लागते. पण श्वासाकडे तटस्थपणे पाहणे ही बाब तशी सोपी नाही. हा प्रवास आपल्या संयमाची परीक्षा घेतो, थकवून सोडतो. पोहायला शिकत असतानाही असेच काहीसे होते. नाकातोंडात पाणी जाते, जीव गुदमरतो आणि मग नको बाबा ते पोहणे असे वाटून जाते. पण आपण प्रयत्न करत राहिलो तर शेवटी यशस्वी होतो हा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे. असेच काहीसे श्वासाबद्दल होते.

एक-दोन श्वास बघतो न बघता तोपर्यंत मन कुठेतरी निघून जाते, भटकते. आपण भटकलो हे लक्षात आले की, परत श्वासाकडे लक्ष. हे असे स्वतःशीच चाललेले द्वंद्व मनाला थकवा आणते. नको बाबा ते श्वासाकडे बघणे, असे वाटून जाते आणि सुरुवातीला आपल्या हाती काहीच लागत नाही. कंटाळून प्रयत्न करणे सोडून देण्याची शक्यता जास्त. आणखी एक खूप मोठी अडचण म्हणजे मनाला खरंच श्वासावर रोखून धरायचे म्हटले तर आपण जाणीवपूर्वक श्वास घेऊ लागतो. म्हणजेच सायास (प्राणायाम) सुरू होतो आणि मग आपल्याच श्वासाला तटस्थपणे न्याहाळणे राहून जाते. बऱ्याच वेळा श्वास न्याहाळण्याच्या धडपडीत रोखून धरला जातो आणि मग गुदमर होते. पण मग अचानक एके दिवशी सायकलचा तोल जमतो, पाण्यात तरंगता येऊ लागते, तसे घडते आणि प्रयत्न यशस्वी ठरतो. काही मुद्रा (प्रामुख्याने भैरवमुद्रा आणि आदीमुद्रा) श्वास जाणण्याच्या प्रवासात खूप पूरक ठरतात. मुद्रा शास्त्र हे खूप प्रगत आणि प्रभावी आहे. प्रयोग करून पाहण्यास तर खूपच सोप्पे. आता कोणी विचारेल की, या बाबीला एवढे महत्त्व का? त्याचे उत्तर असे की, मनाची आणि शरीराची अनेक गुपिते आणि रहस्ये आपल्याला कधीच समजत नाहीत. श्वास नावाच्या किल्लीने मात्र ती सहज उघडली जातात. कोणत्या पायऱ्या आहेत या प्रवासात, कसा करायचा हा प्रवास असे काही प्रश्न पडू शकतात. त्यांची उत्तरे समजून घ्यायला हवी.

सलग दहा ते पंधरा श्वास पकडता आले तरी, आपले मन (जे किती चंचल असते हे आपणा सर्वांना ठाऊक आहे) एकदम सूक्ष्म आणि तरल होते, शरीर एकदम स्थिर होते. शरीर स्थिर करण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही आणि ही स्थिती शब्दातीत शांतता देऊन जाते. जो अनुभव घेईल त्यालाच ते कळेल. आपण या प्रक्रियेत मुरत जातो तसतसे आपले शरीर आणखी स्थिर आणि मन आणखी तरल होत जाते. आपल्या मनाची तरलता, शरीराची स्थिरता एका ठरावीक पातळीस आली की (हे कोणासाठी कधी कसे होईल हा ज्याचा त्याचा प्रवास असेल) आपल्याला आपल्याच शरीरात सतत घडणारे सूक्ष्म बदल (संवेदना) जाणवू लागतात. ही तरलता, संवेदनशीलता आपल्याला एका मस्त अंतर्मुखी प्रवासाला घेऊन जाऊ शकते. अर्थात ते जाणून घेण्याची उत्सुकता, कुतूहल असेल तर. इथेच हा खेळ आणखी गमतीदार होतो आणि नीट समजून घेतले तर आयुष्याला वेगळी दिशा देऊन जातो. एक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की, आपल्या शरीरात सतत जीवरासायनिक आणि विद्युत चुंबकीय क्रिया घडत असतात. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. या प्रक्रिया आपल्या शरीरावर संवेदनांच्या स्वरूपात प्रकट होत असतात. काही क्रिया या भौतिक कारणामुळे असू शकतील. जसे जखम झाली असेल तर तिथले दुखणे वा पोट बिघडले असेल तर तिथले दुखणे. पण या संवेदना बऱ्याच अंशी आपल्याच अंतर्मनावर झालेल्या/दडलेल्या सुप्त भावभावनांचे प्रतीक असतात. प्रत्येकाला यानिमित्ताने आपल्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणवू शकते.

रोजच्या धांदलीत मन खूप जड आणि विचलित असते. संवेदना मात्र खूप सूक्ष्म आणि तरल असतात. त्यामुळे आपण या सर्व प्रकाराबाबत पूर्ण अनभिज्ञ असतो. हे अज्ञान आपले कळत-नकळत खूप खूप नुकसान करून जाते. संवेदना विविध प्रकारच्या जाणवतात. काही खूप क्लेशदायक असतात, तर काही खूप मोहक, रोमांचकारी, पुलकित करणाऱ्या. शेवटी अंतर्मनात दडलेले असते तेच तर तरल मानस पाहू लागते, जाणू लागते. एक खूप महत्त्वाची बाब इथे लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे संवेदना क्लेशदायक असो वा मोहक, आपली भूमिका तटस्थ बघ्याची हवी. नाही तर आपण वेगळ्याच समस्या ओढवून घेऊ. काही संवेदना तर खूप क्लेशदायक, वेदनादायक असू शकतात. म्हणून धीर सोडू नये. श्वास आणि संवेदना यांच्याकडे आपण तटस्थपणे बघू शकलो, तर अंतर्मनावरील हे खोलवरचे आघात बाहेर पडायला, विरघळून जायला मदत होते. एक प्रकारचा हलकेपणा, ताजेपणा जाणवू लागतो. ही प्रक्रिया सहजगत्या आणि निरंतर साधता आली तर खूप प्रभावशाली ठरते, अंतर्मन स्वच्छ करण्यासाठी तिचा उपयोग होतो. श्वासाची ही जाणीव आयुष्यात जादूची एक कांडी ठरली आहे. तुम्ही पण अनुभवू शकता.

(लेखक संगणकशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधारक आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -