मुंबई, कल्याण, नवी मुंबई, ठाणे, खोपोलीत नागरिकांची दाणादाण
मुंबई : मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, खोपोली, बदलापूर येथे शुक्रवार मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडू लागल्याने शनिवार सांयकाळपर्यत रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. मुंबई पश्चिम उपनगरात पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस पडला. सांताक्रुज, पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात मुसळधार पावसाने दिवसभर झोडपून काढले. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता, परंतु शनिवारी अचानक आलेल्या पावसाने पुन्हा एकदा नागरिकांची मोठी दाणादाण उडाली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत अधून-मधून सोसायटच्या वाऱ्यासोबत कोसळणाऱ्या पावसाने शनिवारी पहाटेपासूनच आपला मारा सुरु केला होता. विशेषत: शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरात अधिक पाऊस कोसळत होता. शनिवारी सकाळी १० ते १२ दरम्यान अधून-मधून सोसाटयाच्या वाऱ्यासह वेगाने येणारा पाऊस मुंबईकरांना धडकी भरवत होता. सकाळी दादर परिसरात पडलेल्या पावसाने नागरिकांना उद्योजकांना धडकी भरविली होती. वेगवान पावसाचा मारा कायम राहिला असता तर दादर आणि परिसरात पाणी साचण्याची शक्यता होती. मात्र पावसाने जोर ओसरल्याने पाण्याचा निचरा झाल्याचे दादरमधील व्यापाऱ्यांनी सांगितले.
शनिवारी दुपारी बारा ते एक विश्रांती घेतलेल्या पावसाने नंतर बीकेसी, कुर्ला, सायन, घाटकोपर, विद्याविहार, साकीनाका, अंधेरी, बोरीवली, गोरेगाव आणि पवई परिसरात तुफान बरसात केली. यादरम्यान पडलेल्या पावसामुळे एलबीएस मार्गावरील शीतल सिनेमा सिग्नल, कुर्ला डेपो, काळे मार्ग, कुर्ला स्टेशन, सुंदरबाग लेन, काजुपाडा परिसरात पाणी साचले होते. दुपारी तीन नंतर मात्र पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरल्याचे चित्र होते. दरम्यान, दुपारी दोन ते तीन दरम्यान पूर्व उपनगरात बीकेसी, कुर्ला, घाटकोपर व कांजुरमार्ग परिसरात ढगांनी काळोख केल्याने दुपारीच सायंकाळ झाल्याचे चित्र होते. शनिवारी दुपारी पडलेल्या पावसादरम्यान विद्यार्थ्यांसह पालकांची तारांबळ उडाली होती.
सध्या मोसमी वारे सक्रिय झाल्याने राज्यात येत्या तीन-चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल. तर, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे तसेच पश्चिम बंगालजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्रलगत वाऱ्यांची चक्राकार स्थिती कायम आहे आणि दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने राज्यातील काही ठिकाणांना चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि कोकणात सतर्कता बाळगण्यात यावी. – कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, पुणे, भारतीय हवामान शास्त्र विभाग
नागरीकांनी समुद्र किनाऱ्याकडे येणे टाळावे
वाऱ्याचा वेग ताशी ५२ किमी राहील्याने शनिवारी दिवसभरात समुद्राच्या प्रचंड लाटा बघायला मिळाल्या. रविवारी पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर याठिकाणी येतील. मात्र, दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरीकांनी समुद्र किनाऱ्याकडे येणे टाळावे. राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे आणि उपनगरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पावसामुळे ठाणे- घोडबंदर रोड आणि नाशिक च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा
शनिवारी सकाळ पासून सुरू असलेल्या पावसाने दिवसभर जोरदार बॅटिंग केल्याने ठाण्यात अनेक भागात पाणी साचले होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे- घोडबंदर रोड आणि नाशिक च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा गेल्या आहेत. काही तासापासून वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला होता.मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार रविवारी मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, रविवारी उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधारेचा इशारा
हवामान खात्याने पालघर आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीचा इशारा असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर यांचा समावेश आहे. पुणे आणि साताऱ्यात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. यापूर्वी आयएमडी मुंबईने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला होता. पुढील तीन ते चार तासांत पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाने वर्तवविलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. ऑगस्टमध्ये, मान्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के असण्याची शक्यता आहे. पावसाच्या पाण्याने प्रमुख मार्गांवर पाणी साचलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. आगामी काळात शहरात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे.