माेरपीस – पूजा काळे
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात सुख-दुःखाचे, आनंदाचे, शौर्यातीत पराक्रमाचे लहान-मोठे असे प्रसंग वारंवार घडत असतात. वर्षाचे तीन ऋतू, बारा महिने आणि अधिक मास यामधले जीवनचक्र गतिमान होते, ते जगण्याच्या धावपळीत अन्नधान्य, निवारा शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांमुळे. एक पाय घरात आणि एक पाय बाहेर असलेल्या प्रत्येकावर कसली ना कसली टांगती तलवार असते. संध्याकाळ होईस्तोवर आपला माणूस व्यवस्थित घरी यायला हवा, ही घरच्यांना लागून राहिलेली चिंता माणसाला स्वस्थ बसू देत नाही. सदान्-कदा प्रश्नांच्या गर्तेत अडकलेल्यांना मानसिक, शारीरिक प्रकारच्या ताणांना सामोर जावे लागते. ताण निर्माण करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आसपास घडत असतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सतत बदलत असलेली आपली जीवनशैली. मानवी जीवन क्षणभंगुर असल्याने, सुखाच्या हव्यासापोटी दैनंदिन जीवनातल्या गरजांसाठी आपण आपला आनंद आणि सुखी जीवन दुःखाच्या अथांग सागरात लोटतो. मनुष्याच्या जगण्याच्या विविध तऱ्हा असल्याने, त्यानुसार तो त्याच्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेतो. या आनंदात आहार, विहार, निद्रा यांवर परिणाम होऊन समतोल मात्र बिघडतो.
पाऊस, पाणी, प्रदूषण, रोगराई, आजार, कडक उन्हाळा या विषयांवर ‘मुंबईचे आरोग्य धोक्यात’ या मथळ्याखाली एक बातमी कानावर आली. त्यानिमित्तानेच पार पडलेल्या एका डॉक्टरी सभेच्या आयोजनात मला हजर राहण्याचा योग आला. आनंदीत राहा आणि दीर्घायुषी व्हा या विषयावरील परिसंवादात मनाला आणि एकूणच शरीराला चकटफू आरोग्य मंत्र मिळताच, आनंदाच्या गुरुकिल्लीची गोष्ट आठवत माझे विचारचक्र सुरू झाले.
तसं तर, जगातली निम्म्याहून अधिक माणसे मनावर ओेझे घेऊन जगतात. अहो स्मितहास्य तर सोडाचं, पण रस्त्यावर भेटलेल्या ओळखीच्या माणसाची ओळख आठवेपर्यंत आपण ती विसरतो…! हे असं होत बघा…! मंडळी मनुष्य ज्यामुळे जास्त आनंदी होतो, त्यात सुधारणा झाली, तर आनंदी आनंद चोहीकडे पसरेल. या आनंद लहरी तरंगत येतील हवेतून. त्यावेळी ज्यांच्या जाणिवा-जागृती कार्यक्षम असतील, त्यावेळी त्यांना आनंदाची कमतरता भासणार नाही. दुःखाचे डोंगर आडवे आले, तरी हर्षल वायू लहरी वाहतील. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंत:करणात असतो. तो ज्याला कळतो, त्याच्या आयुष्याचे सोने होते. बाबा आमटे यांच्या आनंदवनाची संकल्पना ही दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी आनंदाची पायमल्ली ठरलीयं. समाजातले अनेक घटक, सामाजिक संस्था, समाजसेवक आपल्यापरीने आनंदाचे साम्राज्य पसरवण्यासाठी हातात हात घालून उभे आहेत. त्यांच्या वाट्याला दुःखद प्रसंग आले असतीलच…! त्यातून तावून सुलाखून निघाल्यावरचं त्यांचे कार्य जगासमोर आल असणार. म्हटलं तर सत्यवचन ही आनंदाची खूण आहे.
विवेकी धोरणामुळे आनंदाला बळकटी प्राप्त होते. त्यासाठी दिलेला सहयोग चिरकाल आनंद देतो. आपल्याकडे म्हणजे समाजात आनंदाच्या व्याख्या व्यक्तीगणिक बदलतात. कधी कुणाला खाण्यात आनंद मिळतो. कुणाला देण्यात आनंद मिळतो, तर नवीन गोष्टी घेण्यात काही धन्यता मानतात. काही अवलियावीर अनोख्या अशा विक्रमाचे सरदार बनतात. शेजारच्या सुमन काकी पलीकडच्या दादरकर काकूंना बडबडण्यात तोंडसुख घेतात. मित्र रमेश सुरेशच्या चांगल्या गोष्टींना नाव ठेवण्यात वेळ दवडतो. बंड्याकडे सायकल जाऊन स्कूटर आलीयं, हा त्याचा आनंद तर गुर्जर काकांच्या बढतीसह बदलीचे आनंदी वारे वाहत आहेत, हा त्यांचा आनंद. आनंदाला जसे बांधून ठेवता येत नाही, तसेच तो कवेतही घेता येत नाही. क्षणभर आनंदासाठी लोकं आपला पैसा-वेळ खर्च करतात. दोन पैशाचा आणि बिन पैशाचा आनंद हा भाग अजून वेगळा असतो. आपल्या आनंदासाठी प्रयत्न करण्यापेक्षा दुसऱ्याला काय दिले तर सौख्य मिळेल, याचा विचार हवा.
आपल्याकडच्या काही गोष्टी समोरच्याला दिल्याने शांतता अनुभवास येते. शिवाय त्यांच आयुष्य उजळून निघत हे विशेष. मंडळी आनंद असा सुगंध आहे की, तो दुसऱ्यावर शिंपित जाता स्वतःवरही शिंपला जातो. मग मस्त आहे ना, हा बिनखर्चाचा स्प्रे. म्हणजे बघा, आनंद शोधू जाता दडून बसतो, पकडू जाता निसटतो, आणि त्याच्यामागे धावू लागताचं हुलकावणी देतो, पण जर त्याला सहजपणे घ्यालं, तर सहज प्राप्त होतो. त्यासाठी थोरामोठ्यांची शिकवण वेळोवेळी उपयोगाला येते. आपल्याला बाळकडू पाजण्याचे काम त्यांच्याकडून वारंवार होते म्हणून तर समाजात आनंद नांदतो. संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमधला आनंद परमोच्च बिंदू गाठतो. तुम्ही हसा दुसऱ्याला हसवा. तुम्ही जगा दुसऱ्याला जगू द्या. या विचाराने पछाडलेला एखादा दुसऱ्याच्या आयुष्याचं सोने करतो. लीना-गोविंद सारखे जोडपे. स्वतःचे अपत्य असताना देखील, संस्थेतील मुलगी दत्तक घेण्याचे धाडस करतात. हा त्यांनी साधलेला कौटुंबिक आनंद जो, त्या मुलीसाठी मोलाचा, मार्गदर्शक ठरणार आहे. जसे आनंदी क्षण आपल्या आसपास रेंगाळत असतात. तसे ते टिपण्याची दृष्टी हवी. छोट्या गोष्टीतला आनंद मोठ्या मनाने देता यायला हवा तर आयुष्य सार्थकी लागत.
एक छोटेसे फूल एका दिवसात साऱ्या जगाला आनंदित करते. मग आपण आपल्या मोठ्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात आनंद वाटायला हवा ना! काल झाले त्याबद्दल दु:ख न बाळगता, उद्या काय होणार याची चिंता न करता, आज जे काय करायचे ते आनंदाने. हे सामाजिक कर्तव्य जाणूनच शारीरिक, मानसिक, आंतरिक समाधानपूर्तीसाठी आनंदाचे एक रोपट आपल्या अंगणात लावायला हवे. त्यासाठी आपलं असणं हे खूप महत्त्वाच आहे. कारण आपलं असणं ही आनंदाची खूण आहे. तेव्हा हे ‘विश्वची माझे घर’ म्हणताना आनंद हा या विश्वाचा एक भाग मान्य करायला हवा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सिद्धी आपल्या हातात आहेत, हे जाणून आपला कार्यभाग साधायची, हीच खरी वेळ आहे.