Wednesday, April 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane : महाड तालुक्यातील कत्तलखाने उद्ध्वस्त करा!

Nitesh Rane : महाड तालुक्यातील कत्तलखाने उद्ध्वस्त करा!

आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धरले धारेवर

महाड : महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे झालेल्या गोवंश हत्या प्रकरणात गोरक्षक हिंदू तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेवर पोलिसांकडून कारवाई मात्र संथ गतीने सुरु असल्याने या प्रकरणी जाब विचारण्यासाठी आमदार नितेश राणे हे काल रात्री महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या ठिकाणी डिवायएसपी शंकर काळे व महाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांना आमदार राणे यांनी धारेवर धरले.

गोवंश हत्या करणाऱ्या या कसायांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहे. जनावरांची होणारी तस्करी व कत्तल रोखणे हे पोलिसांचे काम असून ते काम करणाऱ्या गोरक्षकांनाच जर या कसायांकडून मारहाण होत असेल तर आपण ते खपवून घेणार नाही असा सज्जड दम आमदार राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना भरला.

दोन दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे झालेल्या गोवंश हत्याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे महाड तालुक्यातील संबंधित कत्तलखाने ताबडतोब उद्ध्वस्त करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. पोलिसांनी संबंधितांविरोधात कारवाई न केल्यास आम्हाला हातात शस्त्रे घ्यावी लागतील, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

बुधवारी रात्री उशिरा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाड उपविभागीय पोलीस अधीक्षक शंकर काळे यांची भेट घेऊन आमदार नितेश राणे यांनी गोरक्षकांविरोधात झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांना जाब विचारला. कायद्याचे राज्य असताना अशा पद्धतीच्या घडणाऱ्या घटना या दुर्दैवी व संतापजनक आहेत. गाईचे रक्षण करण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर झालेला हल्ला यापुढे आम्ही सहन करणार नाही, संबंधितांना जशास तसे उत्तरे देऊ, अशा शब्दात त्यांनी डीवायएसपी शंकर काळे यांना दरडावले.

संबंधित समाजकंटकांकडून पोलिसांवर हात उगारण्याची हिंमत होते कशी, असा सवाल करून या घटनेनंतरही गोरक्षकांना दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी सहन करणार नाही व गोरक्षकांविरोधात कारवाई केल्यास विधानसभेमध्ये जाब विचारू असे ते म्हणाले. कायदा सर्वांना समान आहे तर या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण काय, संबंधित दोषींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी महाड पोलादपूरमधील गोरक्षकांसह शेकडो हिंदुत्ववादी युवक उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -