गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला
सकाळची वेळ होती. रस्त्यावर जाणा-येणाऱ्यांची वर्दळ सुरू होती. जणू काही सृष्टीला हळूहळू जाग येत होती. अशातच रस्त्यावरून जाणाऱ्या भिकाऱ्याचा आवाज कानावर पडला. एक भिकारी सुंदर असे भजन गात, भिक्षा मागत जात होता. त्याचे गायन अतिशय सुस्वर असेच होते. भजन गात, भिकारी एका घरासमोर आला. घरातील स्त्रीने “थोड थांबा. येतेय.” असे म्हणत, भिक्षा आणण्यासाठी आत गेली. काही जिन्नस हातात घेऊन, ती स्त्री दाराजवळ उभी राहिली.
भिकारी भजनाचे पद आळवित होता. ऐकणाऱ्याच्या कानांना त्यातील आर्त भाव आणि शब्द गोड वाटत होते. ती स्त्री हातात भिक्षा घेऊन, तिष्ठत उभी होती. पण पुढे जाऊन भिकाऱ्याला भिक्षा देत नव्हती. तसेच “थोडं थांबा. आलेच.” असे मधूनच म्हणत होती. हे सर्व पाहून, त्या घराचा स्वामी तिला म्हणाला की, “बऱ्याच वेळापासून तू भिक्षा देण्याकरिता दाराजवळ उभी आहेस. मग त्याला भिक्षा का देत नाहीस?”
यावर ती गृहलक्षी म्हणाली, “स्वामी, भिक्षा तर देणारच आहे मी; पण मला ते भिकाऱ्याने गायलेलं भजन पूर्ण ऐकायचं आहे. म्हणून मी त्याला भिक्षा देण्यास विलंब करीत आहे.”
हीच गोष्ट प्रार्थना करीत असताना स्मरणात ठेवा. “आपली प्रार्थना भगवंताला ऐकू गेली नसावी का?” असा विचार न करता “आपली प्रार्थना परमेश्वराला खूप आवडली असावी. त्यातील भाव, आर्तता, श्रद्धा आणि भक्ती ही देखील परमेश्वराला आवडली असावी म्हणूनच भगवंताची आपल्याला वाट पाहावी लागतेय, हा विचार मनात बाळगून प्रार्थना करणे सुरू ठेवा.
एकदा देवर्षी नारद श्रीहरींना भेटून, त्यांचे दर्शन घेण्याकरिता निघाले. संपूर्ण त्रैलोक्य फिरून आले. पण त्यांना श्री केशवराजाचे दर्शन झाले नाही. शेवटी थोडी विश्रांती घ्यावी म्हणून त्यांनी एका मंदिरात प्रवेश केला. पाहतात तर काय त्या मंदिरात भक्त मंडळी भगवत भजनामध्ये तल्लीन झाली होती. नारदांनी मंदिरातील एका कोपऱ्यात पाहतात, तर काय महाविष्णू श्रीहरी आनंदित होऊन उभे असलेले त्यांना दिसले. नारद लगबगीने भगवंताजवळ आले. भगवंतांना प्रणिपात करून “भगवंता, मी आपल्या दर्शनाकरिता अखिल त्रैलोक्य फिरून आलो; पण आपले दर्शन झाले नाही. आपला निवास नेमका कोठे असतो, ते कृपया सांगावे.”
नारदांच्या या प्रश्नावर श्री विष्णूंनी मंद स्मित केले आणि म्हणाले की,
नाहं वसामी वैकुंठे l
योगीनां ह्रदये नच l
मद्भक्ता यत्र गायंती l
तत्र तिष्ठामी नारद ll
याचा अर्थ
“हे नारदा मी वैकुंठात राहत नाही. तसेच योगिजनांच्या हृदयात देखील नाही, माझे भक्त ज्या ठिकाणी माझे गायन (नामस्मरण) करतात तिथेच मी तिष्ठत उभा असतो.” निष्ठा, भक्ती आणि श्रद्धेने केलेली प्रार्थना भगवंताला आवडते, तर मंडळी प्रार्थना करीत राहू या. भगवंताशी जवळीक साधू या.