मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांचे आवाहन
पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान ; २४ हजार ५७९ मतदान केंद्र, सुमारे २ कोटी ४६ लाखांपेक्षा जास्त मतदार ; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज
चौथ्या टप्प्यात सरासरी ६२.२१ टक्के मतदान
मुंबई : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघासाठी २० मे रोजी मतदान होत असून यामध्ये सर्व पात्र मतदारांनी प्राधान्याने आपल्या मतदानाचा महत्वपूर्ण अधिकार बजावून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना चोक्कलिंगम म्हणाले, चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा मतदारसंघामध्ये ६२.२१ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत या आकडेवारीत एक टक्क्याने वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया आयोगामार्फत वर्षभर सुरु राहत असून पाचव्या टप्प्यातील मतदारसंघातील मतदार यादीत २२ एप्रिल २०२४ पर्यंत नाव नोंदणी केलेल्या सर्व मतदारांची यादी ऑनलाईन उपलब्ध असून यादीत नाव असलेल्यांना मतदान करता येणार आहे.
पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण २४ हजार ५७९ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या निवडणुकीत २ कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या तेरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ४१,८९७ तर कंट्रोल युनिट (सीयु) २४,५७९ आणि २४,५७९ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून चौथ्या टप्प्यात एकूण २६४ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मतदान केंद्र परिसरात १०० मिटरच्या आत भ्रमणध्वनी यंत्रणा (मोबाईल) नेण्यास निर्बंध आहे. ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.