हत्येमागील कारण ऐकून पोलीसही हादरले
लखनऊ : भावाबहिणीचं नातं हे पवित्र मानलं जातं. आईबाबांनंतर काळजी घेणारी घरातील जवळची ही मोठी भावंडंच असतात. मात्र, याच भावाबहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडली आहे. भावंडांमधील सगळ्यात मोठ्या बहिणीने आपल्या दोन लहान बहिणींचा गळा आवळून जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, ही मोठी बहिण केवळ १३ वर्षांची होती. तपासादरम्यान हे लक्षात आल्याने पोलीस हादरले. लहान बहिणींच्या हत्येचे तिने सांगितलेले कारण ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.
एसीपी नीरज कुमार जदौन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेबाराच्या सुमारास नूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गौहावर जैत गावात दोन मुलींची हत्या झाल्याची माहिती मिळाली. दोन मृत मुलींचं वय ७ आणि ५ वर्षे होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांना तेथील एका घरात सहदेव आणि सविता यांच्या सात आणि पाच वर्षांच्या दोन मुलींचे मृतदेह आढळून आले.
सहदेव आणि सविता त्यांच्या ५ मुलांसह या घरात राहत होते. सविताने दोनदा लग्न केलं आहे. तिचं पहिलं लग्न पुखराज नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. सविताची मोठी मुलगी (१३) आणि तिची धाकटी मुलगी (९) या पुखराजच्या मुली आहेत. ज्या दोन मुलींची हत्या करण्यात आली त्या सविताचा दुसरा पती सहदेव यांच्या मुली होत्या. याशिवाय सविता आणि सहदेव यांना दीड वर्षांचा मुलगाही आहे. या प्रकरणी पोलिसांनी १३ वर्षांच्या मोठ्या मुलीची चौकशी केली.
पोलीस चौकशीत सुरुवातीला मोठ्या मुलीने सांगितलं की, दोन अनोळखी लोक घरात आले आणि त्यांनी दोन्ही बहिणींचा गळा दाबून खून केला. मात्र, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना कोणीही जबरदस्तीने घरात घुसल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. नंतर मात्र मोठ्या बहिणीने तिने दोन्ही बहिणींची हत्या केल्याचं कबूल केलं. मोठ्या मुलीने सांगितलं की, वडील मोठं कुटुंब असल्याने चिंतेत होते, म्हणून तिने दोन्ही बहिणींची दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केली. दोन्ही मुलींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.