कविता : एकनाथ आव्हाड
मधूला भेटले, जंगलात प्राणी
म्हणतात ऐक रे, आमची गाणी
हत्तीनं गायली,
गणपतीची आरती
वाघाच्या अभंगात,
किती रसवंती
माकडानं भावगीत,
म्हटलं छान
पोवाड्यात घेतली,
जिराफानं तान
हरीण गायली,
लावणी सुरेख
कोल्ह्याने म्हटली,
गझल एक
सशानं गायलं,
छोटंसं बालगीत
लाडंग्याचं मस्त, होतं स्फूर्तिगीत
चित्त्याचं लोकगीत,
फारच गोड
झेब्र्याच्या कव्वालीला,
नव्हती तोड
सिंहाने गर्जून,
अंगाईगीत म्हटलं
मधूनं घाबरून,
पळत घर गाठलं
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) अटकळ, आशंका
अनुमान, अदमास
तर्क, पडताळा
ताडबाजी, कयास
संभव, होरा
असेही म्हणतात
कोणत्या शब्दासाठी
ही नावे वापरतात?
२) अतिशय, पुष्कळ
मुबलक, फार
विपुल, भरपूर
भरमसाट, अपार
उदंड, जास्त
अगाधही म्हणती
कोणत्या शब्दाची
ही नावं समानार्थी?
३) अचराण, रान
जंगल, वन
राजी, झरकुंड
विपिन, कानन
हजल, राहट
अटवी, झाडी
कोणत्या शब्दाची
ही नावं आहेत एवढी?