Tuesday, July 23, 2024

काव्यरंग

पोस्टमनदादा

पोस्टमनदादा पोस्टमनदादा
रोज रोज वाटता पत्र
खुशालीचा निरोप देत
बनता सर्वांचे मित्र
खाकीचा जाड पोशाख
शोभून दिसतो अंगावर
जाड पिशवी उघडून
पत्र वाटता भराभर
काळजीने बजावता तुम्ही
आपले चोख काम
ऊन असो, पाऊस असो
मुळीच नसतो आराम
सायकलची घंटा वाजवित
येता तुम्ही दारी
मनीऑर्डर दिली की
आम्हा खुशी होते भारी
पोस्टमनदादा पोस्टमनदादा
सांग ना मला खरं
तुम्हाला कसे हो माहीत
प्रत्येकाची घरं?
– रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ.

वरदान

काय गुन्हा माझा
सांग ना रे देवा
मन रोपटे प्रेमाचे
हाच तुझा ठेवा

ह्या आसमंती रे
चंद्र तारके वसती
फक्त या धरती
बीज तुझे रुजती

का ठेवतोस दुरावा
ऊन पाऊस वारा
लिवून सर्व सृष्टी
शृंगाराचा पसारा

देते सर्वस्व दान
हरपून तिचे प्राण
नव्याने जन्म घेते
ठेव जरा जाण.

नाही कुठेच रुजतं
अंकुर हिरवळीचे
अहोभाग्य समज
वरदान धरतीचे.
– सोनाली जगताप

आई

आई गं आई, बरं का गं बाई
माझा तुझा वाढदिवस करशील की नाही?
शोभा-शिला-शुभा, जोशांची विभा
सर्वांच्या आधी येईल आई…
लाल-लाल पाट, चांदीचं ताट,
ताटाच्या भोवती रांगोळीचा थाट…
मुले-मुली येतील, गोल-गोल बसतील
गोड-गोड लाडू मज्जेत खातील
बुंदीचे लाडू जेवायला वाढू,
वाढदिवसाला सेल्फी काढू…

नाव : शौर्या सुमीत कासारे
इयत्ता : पहिली
शाळेचे नाव : सोशल सर्व्हिस लीग मराठी प्रायमरी स्कूल, मुंबई, परेल

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -