Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यSamruddhi Mahamarga : ‘समृद्धी महामार्ग’ रस्ते उभारणीतून शक्तिपीठाकडे

Samruddhi Mahamarga : ‘समृद्धी महामार्ग’ रस्ते उभारणीतून शक्तिपीठाकडे

  • मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे

राज्यातील रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास अतिशय वेगाने होत असून, चांदा चंद्रपूर ते बांदा सावंतवाडी हे अंतर असो वा राज्यात कुठून कोठेही २२ ते २४ तासांत रस्ता मार्गे न जाता अगदी सहा ते सात तासांत पोहोचावे असे नियोजन व पायाभूत सुविधा राज्य सरकारने केली असून, रस्ते व दळणवळण सुविधेमध्ये महाराष्ट्र राज्य एक आदर्शवत उदाहरण ठरणार, यात काहीच शंका नाही.

सध्या महाराष्ट्रात आठ लाख कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. यापूर्वी राज्यातल्या राज्यात जाण्यासाठी २० ते २२ तास लागत, मात्र युती शासनाच्या काळात पहिला मुंबई – पुणे द्रूतगती मार्ग झाला आणि पुणे ते मुंबई हे ६ ते ७ तासांचे अंतर अगदी अडीच ते तीन तासांवर आले आणि राज्याला आपल्या प्रगतीचा एक नवीन मार्ग सापडला. आज आपण मुंबईहून पुणे, नाशिक येथे जलद मार्गाने पोहोचतो, तर मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाने जो महाराष्ट्राच्या प्रगतीचा एक माईल स्टोन असा मार्ग ठरला आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्याचे कामही आता पूर्ण झाले असून, हा २५ किलोमीटरचा टप्पा सेवेत दाखल होत आहे. हा टप्पा कार्यान्वित झाल्यामुळे नागपूर ते इगतपुरी थेट प्रवास करता येणे आता शक्य झाले आहे. मुंबई – नागपूर हा मार्ग ७०१ किलोमीटरचा असून, सध्या नागपूर ते भरवीर ६०२ किलोमीटरचा टप्पा सेवेत आहे. भरवीर इगतपुरी या तिसऱ्या आणि इगतपुरी ते आमणे या चौथ्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. इगतपुरी ते आमणे या टप्प्याचे काम वेगात पूर्ण करणे एमएसआरडीसीचे लक्ष असून, इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई-नागपूर अतिवेगवान प्रवास करणे शक्य होणार आहे. तसेच आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा थेट गोंदिया व चंद्रपूरपर्यंत विस्तारित केला जाणार आहे. या मार्गावरील प्रमुख शहरे जोडण्यासाठी देखील सिंदखेड राजा ते शेगाव चौपदरी मार्ग, भंडारा ते गडचिरोली, नागपूर ते चंद्रपूर व नागपूर ते गोंदिया तसेच जालना ते नांदेड द्रूतगती मार्ग बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

राज्य सरकारतर्फे आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने ४५१ किलोमीटर रस्त्यांचा आतापर्यंत विकास केला असून, नाबार्डच्या कर्ज सहाय्य योजनेअंतर्गत २४७० किलोमीटर रस्त्यांची सुधारणा केली आहे व ७३१ पुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे, तर हायब्रीड एनियुटी प्रकल्पाअंतर्गत ६७०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम पूर्ण केले जात आहे.

राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७-२८ पर्यंत एक लाख कोटी डॉलरची करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या दिशादर्शक अहवालानुसार आवश्यक धोरणांची अंमलबजावणी यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यानुसार स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचा विस्तार आता पालघरपर्यंत, तर विलासराव देशमुख पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ७५०० किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेण्यात येत असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ६० हजार ६०० कोटी रुपये खर्चून ७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दर्जोंनती करण्याचे यावेळी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे.

राज्य सरकारचा आणखी एक बहुचर्चित मार्ग म्हणजे विरार – अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉर. यामुळे विरार ते अलिबाग या दरम्यान पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्ये एकमेकांशी जोडण्यात येतील, तसेच राज्य सरकारतर्फे पुणे वर्तुळाकार मार्गाच्या भूसंपादनासाठी योग्य ती तरतूद करण्यात आली आहे. जालना-नांदेड द्रूतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी २८८६ कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत.

राज्याच्या मानातील आणखी एक तुरा म्हणजे नुकताच सुरू झालेला देशातील सर्वात लांब बसलेला सागरी मार्ग, म्हणजे अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा अटल सेतू. हा १३ जानेवारीपासून जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर २० मिनिटांच्या अंतरावर आले आहे. मुंबई महापालिकेच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. पालिकेने विकासकामांसाठी येता अर्थसंकल्पात ३१ हजार ७७४.५९ कोटींची भांडवली तरतूद केली आहे. या तरतुदींपैकी तब्बल १२,११० कोटी रुपये हे रस्ते व सागरी किनारा प्रकल्प पूल यासाठी वापरण्यात येणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्यात नरिमन पॉइंट – वांद्रे सागरी किनारा मार्ग असो वा गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता, असे मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. एकूण भांडवली तरतुदींच्या सुमारे ४० टक्के निधी हा पायाभूत सुविधांसाठी ठेवला जात आहे. गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाची चार टप्प्यांची कामे सुरू होऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून १३ मीटर व्यास असलेल्या ४.७ किलोमीटर लांबीच्या जोड बोगद्याचे आणि फिल्मसिटी परिसरात पोहोच रस्त्याचा १.६ किलोमीटर लांबीच्या बोगदाचे काम करण्यात येणार आहे. बोरिवली-ठाणे महामार्ग याच संजय गांधी राष्ट्रीय उद्याना खालून जाणार आहे.

तसेच वर्सोवा ते दहिसर मार्ग आणि दहिसर ते भाईंदर उन्नत रस्त्याचे काम यंदा पालिका मार्गी लावणार आहे. समृद्धी महामार्गानंतर नागपूर ते गोवा असा शक्तीपीठ मार्ग लवकरच बनवला जाणार आहे. यात नागपूर-वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे, त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या माहूर, तुळजापूर, अंबेजोगाई ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर देखील जोडले जाणार आहेत. हा मार्ग आता एकूण ८०५ किलोमीटरचा असणार आहे, त्यामुळे रस्ता उभारणीत महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -