Friday, November 15, 2024
Homeताज्या घडामोडीArun Mhatre : 'उंच माझा झोका' फेम कवी अरुण म्हात्रे प्रहारच्या गजालीत...

Arun Mhatre : ‘उंच माझा झोका’ फेम कवी अरुण म्हात्रे प्रहारच्या गजालीत…

आरतीत तेवी माझ्या, मंद या व्रताची समयी, तुळशीचे रोप माझे…उंच आभाळात जाई…मीच ओलांडले मला… सोबतीस माझा सखा येई, कवेत आकाश… झुले उंच माझा झोका… त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका… आपल्या अनोख्या काव्यशैलीने साहित्य क्षेत्रात प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या ग्रामीण आणि शहरी कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली आहे. त्यांनी आपल्या कवितेच्या प्रवासाबद्दल प्रहार आयोजित गजाली कार्यक्रमात प्रहार टीमसोबत संवाद साधला. यावेळी प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

मनो-वेधला कवी : अरुण म्हात्रे

तेजस वाघमारे

अलिबाग तालुक्यात हशिरे माझे गाव. मी अगोदर मुंबईला होतो, नंतर गावी गेलो. पहिली-दुसरीचे शिक्षण मुंबईत झाले. वडिलांची नोकरी गेल्याने गावी जावे लागले. गावचा तिसरी ते सातवीपर्यंतचा काळ हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण काळ. कारण आजूबाजूला डोंगर, समोर खाडी, शाळेच्या समोर तळे, त्याच्या बाजूला देऊळ, समोर पायवाट, धुळीने जाणाऱ्या एसटी गाड्या. भरपूर पोहलो, भरपूर सायकल चालवल्या, भरपूर आंबे खाल्ले, जांभळे खाल्ली, खाडीत मासे पकडले, असे ते दिवस होते. ते सगळे कवितेत आले आहे. असे म्हटले जाते की, मनुष्य दहाव्या वर्षापर्यंत जे जे बालपण अनुभवतो, तेच तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात लिहीत असतो. त्यामुळे तुमचे जेवढे आयुष्य समृद्ध तेवढे तुम्ही लिहीत जाता. जेवढे ऊन तुम्ही सोसता, तेवढी तुम्ही चांदण्याची कविता करू लागता. जेवढा तुम्ही त्रास सहन करता तेव्हा स्वप्नातील सुंदर जग सांगत असता. मला नेहमी कवी सुरेश भट यांची आठवण येते, भटांच्या पायाला पोलिओ झाला होता. त्यामुळे त्यांना चालता येत नव्हते, शाळेत, कॉलेजात जाताना ते अपंग होते. तुम्हाला असे लक्षात येईल की, अपंग म्हणून एखादा माणूस काठी घेऊन शाळा-कॉलेजात जातो, तर तेव्हा त्याला काय वाटत असेल ! खूप सुंदर मुली दिसत आहेत, इतकं सुंदर लिहिता येते, पण आपल्यावर प्रेम करेल असे कुणीच नाही. पण म्हणून की काय, सुरेश भटांनी अत्यंत उत्तम प्रेम कविता लिहिल्या आहेत. “बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग” हे सुरेश भटांनी लिहिले आहे. पण माझ्या बाबतीत खूप चांगली गोष्ट झाली आहे, ती म्हणजे आमच्याकडे रेडिओ होता. रेडिओवर जेव्हा पाडगावकरांना ऐकलेले आठवते. “पहिल्या हिरव्या तृणपत्याचा आज असे सत्कार” असे ते त्यांच्या खास शैलीत म्हणायचे. ते मला भयंकर आवडले. वेगळे वाटले. मला आता लोक निवेदन करायला सांगतात. माझे निवेदक गुरू नीलम प्रभू, बाळ कुडतळकर, सतीश दुभाषी यांना मी मनापासून ऐकले आहे, ते सगळे माझ्या मनात आहे. पण मला कधी त्यांना बघायला मिळाले नाही. ते मुंबईत आणि मी गावी. पण काशिनाथ घाणेकर यांचे नाटक, चित्तरंजन कोल्हटकर, पणशीकर यांचे नाटक हे सगळे मी गावी रेडिओवर ऐकले आहे. तसे त्यांची कॉपी करून नीट मस्त बोलायचो. नीला ताईंला मी आकाशवाणीला भेटलो आणि तुम्ही माझ्या गुरू आहात, असे सांगताच त्यांनी ‘आ’ केले. मी कशी काय तुमची गुरू असे त्या म्हणाल्या. नीलम प्रभू यांच्यासारखी आकाशवाणीवरची निवेदिका किंवा ऐक्ट्रेस अजून कोणी झाले नाही. काय आवाज होता. या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर होता. पुढे मी पोद्दार कॉलेजमध्ये होतो. कॉमर्स शिकावे लागत असल्याने खूप वाईट वाटत होते. बुक किपिंग शिकावे लागायचे. त्याचा त्रास व्हायचा. पण वडिलांनी नोकरी करायचे सांगितल्याने मी कॉमर्सला गेलो होतो.

बाजूला रुईयामध्ये खूप छान कार्यक्रम व्हायचे. एकांकिका, विविध स्पर्धांमध्ये रुईया पुढे असे. आम्ही तिकडेच असायचो. त्यामुळे मराठीचा सहवास झाला. राम पटवर्धन सर योगायोगाने शिकवायला होते. मराठीमधला खूप मोठा माणूस. ते फार बोलायचे नाहीत. पण त्यांनी आम्हाला तयार केले. मी त्यांना ४६ पानांची छान अक्षरात लिहिलेली कवितांची वही दिली होती. मला वाटले सर काय छान लिहिलेय म्हणतील. पण सर म्हणाले, यात एकही कविता तुझी नाही म्हणाले. यामध्ये सर्व कविता प्रभावाच्या कविता आहेत. कुठे आरती प्रभू, कुठे ग्रेस, कुठे नारायण सुर्वे, कुठे करंदीकर दिसतात. तुझे काय आहे त्याच्यात? त्यांच्या शब्दांनी माझ्या सर्व स्वप्नांवर गोळा फिरवला आणि त्यांनी कविता म्हणजे काय असते ते सांगितले. त्यांनी जे सांगितले होते ते टाळून हळूहळू कविता लिहू लागलो. माझी पहिली कविता एका दैनिकात प्रसिद्ध झाली. चित्रपटाची आवड लहानपणापासूनची. माझा जन्म डोंगरीचा. डर्बी टॉकीज जवळचा जन्म आहे. त्यामुळे चित्रपट धावत जाऊन बघायचो. दारासिंग, किंग काँग यांचे चित्रपट असायचे. अनेक चित्रपट पाहिले, त्यांचा प्रभाव खूप होता आणि नाटकाचीही आवड होती. त्यामुळे नाट्यमय असेल ते ते मला आवडायचे. मी शाळेतील नाटकात काम केले आहे. आकाशवाणीवर लागणाऱ्या गाण्यांची खूप प्रॅक्टिस करायचो. म्हणून मी कवी म्हणू शकतो. आकाशवाणीने मला अर्धे तयार केले आहे. कविता, गाणी आणि इतके आवाज, समीक्षा आकाशवाणीवर ऐकायचो. गदिमा, सुरेश भट, पाडगावकर ऐकले. त्यावेळी फार कळायचे नाही, पण ते काहीतरी ग्रेट लिहितात असे वाटायचे. त्यांच्याबरोबर साहिर, इंदीवर, शैलेंद्र, नीरज ऐकला. सगळे हिंदी कवी ऐकले. मग महम्मद रफी, किशोर कुमार ऐकला. त्यांच्यामुळे मनाची जडणघडण झाली. मी शंकर वैद्य यांच्या कवितेची ओळ नेहमी म्हणतो, “मी मावळताना सूर्य पहिला होता, मी मावळताना चंद्र देखिला होता, त्या दिवशी घडले विपरीत क्षितिजावरती, मी मावळताना देश पहिला होता.” ही जी ताकद आहे ना, त्याला आम्ही कसून लिहिणे म्हणतो. ती ताकद कवितेमध्ये आहे असे मला वाटते. कवितेचा राजकारण, सामाजिकता, कला, नृत्य, सिनेमा अशा सगळ्यांशी संबंध आहे. मला आरती प्रभू, भा. रा. तांबे, केशवसुत, बालकवी, ज्ञानोबा, तुकोबांच्या नावानी पुरस्कार मिळाले. पण ‘उंच माझा झोका’मुळे खूप प्रसिद्धी मिळाली, याचा खूप आनंद होतो.

कविता झाल्या ‘गुलजार’

वैष्णवी भोगले

ती वेळ निराळी होती,
ही वेळ निराळी आहे…
तू वळून हसलीस तेव्हा
नक्षत्र निथळले हाेते…
गावाच्या सीमेवरी
जगण्याच्या हाका येती…
किंवा खिडक्यांच्या गजांवर एवढंही आभाळ नाही…

अशा एकापेक्षा एक जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या आणि निसर्गाशी एकरूप होणाऱ्या आणि गावाकडे जीवन दर्शवणाऱ्या एकापेक्षा एक सरस कविता लिहिण्याचे कसब कवी अरुण म्हात्रे यांच्या कवितेत ओतप्रोत भरलेले आहे. त्यांची कविता भारावलेली आणि मंतरलेली आहे.

अरुण म्हात्रे हे गेय कविता लिहिणारे कवी. ते प्रेमातली आर्तता, विव्हलता, अगतिकता अत्यंत प्रभावीपणे मांडतात. अरुण म्हात्रे यांचे अनेक कवी मित्र आहेत. त्यामध्ये शैलेंद्र, साहीर, जनिसार अक्सर, एस.एच.बिहारी, राजेंद्र कृष्ण तसेच त्यांना गुलजार यांच्या कविता, गाणी ऐकायला आवडायची. गुलजार हे उत्तम कवी, दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी ‘परिचय’, ‘खुशबू’, ‘किनारा’ या चित्रपटामधली गाणी त्यांना भावली.

गुलजार यांच्या लेखणीतील भावनांचा प्रभाव म्हात्रे यांच्या कवितेवर पडला. अरुण म्हात्रे यांच्या कवितेत चंद्र, सूर्य, तळं, समुद्र, वारा, गाई अशा गावच्या गोष्टी भरून उरल्या आहेत. अरुण म्हात्रे सांगतात की, आमच्या दोघांच्या कवितेमधली एक गोष्ट सारखी आहे. ती म्हणजे गावच्या आठवणी. अरुण म्हात्रे यांच्या अनेक कवितांमधून गावच्या आठवणींचा उल्लेख केला आहे. अरुण म्हात्रे म्हणतात, गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांची अनेक गाणी मी म्हटली होती. त्यांची जेवढी मी गाणी म्हणतो, तेवढी ते सुद्धा बोलत नसतील असेही ते मिश्कीलपणे म्हणाले. मुलुंड येथील जिन्याखालची पुस्तकांची खोली गुलजार यांना दाखवायची होती, ती राहून गेली ही एक खंत त्यांच्या मनात कायम आहे. कवीमध्ये कसून कविता लिहिण्याची ताकद असावी लागते, त्यांच्याजवळच्या शब्दसंपत्तीमुळे कवितेचा उदय होत असतो. त्यातूनच कवी लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान होतात. अरुण म्हात्रे यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास ते प्रामुख्याने गेय कविता लिहिणारे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सर्वच कविता एक छान लय घेऊन जन्माला आल्या आहेत. त्यांच्या सुंदर शब्दांच्या कविता माणसांना नेहमीच उत्तेजना देतात.

‘कवितेची खोली’

मानसी खांबे

मुलुंडमधील स्वप्नवत गोष्ट म्हणजे अरुण म्हात्रे यांची जिन्याखालची खोली. घरात पुस्तक आणि मानचिन्ह वाढल्यामुळे त्यांच्या राहत्या ठिकाणी काकुर्डेकर नावाच्या बाईंकडे कार्यक्रमांचे नियोजन करायला जायचे. त्यांच्याकडे असणारी जिन्याखालची पडीक खोली पुस्तक ठेवण्यासाठी भाड्याने देऊ शकाल का? अशी मागणी करताच जे काही पैसे देशील ते दे म्हणत, काकूर्डेकर यांनी अरुण म्हात्रे यांना खोली भाड्याने दिली.

आजूबाजूला नर्सरीचे वातावरण असणाऱ्या खोलीत ते लिहीत, वाचत बसायचे. इतर कवी मंडळींना अरुण म्हात्रे एकटेच खोलीत बसलेले असतात, अशी कुणकुण लागली. त्यानंतर अनेक कवींनी हजेरी लावायला सुरुवात केली. कधी किशोर कदम, नरेश पाटील, किरण येले, अशोक बागवे, सतीश वांगुळकर, अशोक नायगावकर, संगीतकार मिथिलेश पाटणकर असे अनेक जण हजेरी लावत. हेमंत जोगळेकर, संदीप खरे, इंद्रजित भालेराव असे मोठे कवी, नाटककार व पत्रकार मंडळी त्या खोलीत येऊन गेली. हे सांगताना ते म्हणतात की, आमचे वयच तसे होते. शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे सगळे कवी शुक्रवारी भेटायचे. त्याच ठिकाणी सर्व मंडळी मिळून कधी गाणं, कविता म्हणायचे, कोणी नाटक करायचे, सगळी मज्जा होती. ही खोली अनेकांना माहीत पडली. त्यामुळे ती ‘कवीची खोली’ म्हणून प्रसिद्ध झाली. मराठी कवितेत जे काही घडणार, ते त्या खोलीत घडायचे अशी ती गमतीशीर खोली असल्याची आठवण अरुण म्हात्रे यांनी सांगितली.

ती खोली फार सुंदर होती असे नव्हे, तिच्या भिंती खराब होत्या, पाणी देखील वेळेवर येत नसे, अशी ती कवितेची खोली असली तरीही ती पुस्तकांनी छान सजवली होती. अशा प्रकारे खोली श्रीमंत नसली तरीही तिथे येणारी मंडळी श्रीमंत होती. त्याच खोलीत अनेक लेखकांनी नाटके, कविता लिहिल्या गेल्या.

अर्थात त्या खोलीनेच सर्वांना संपन्न केले. मुलुंड सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्याने जिन्याखालची कवितेची खोली सोडावी लागली, त्याचे त्यांना वाईट वाटते, कारण ती खोली त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट होती. आता कर्जत येथे नवीन कवितेची खोली तयार केली आहे; परंतु मुलुंडच्या खोलीची गंमत तिथे नसल्याचे अरुण म्हात्रे सांगतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -